रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्या, भेटीचा अभूतपूर्व सोहळा, फेडले डोळ्यांचे पारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:58 PM2018-03-03T19:58:35+5:302018-03-03T19:58:35+5:30
बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदिरात आल्या असताना दोन्ही पालख्यांची भेट मंदिराच्या आवारात झाली. दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती.
रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदिरात आल्या असताना दोन्ही पालख्यांची भेट मंदिराच्या आवारात झाली. दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती.
शुक्रवार, २ रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरूगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून श्री भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरुन झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे आली.
पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार मागील समुद्रमार्गे जाऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता आली. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल. तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता आली. तेथून पुढे लक्ष्मी चौक, झाडगावमार्गे मुरूगवाडा घसरवाट येथे राजेंद्र महादेव सुर्वे यांच्या कंपाऊंडमध्ये होळी घेण्यासाठी आली.
तेथून परत होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभी करण्यात आली. रात्री ९ वाजता धूळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीचे निशाण सहाणेवरून काढण्यात आले. झाडगावात फिरून श्री देवी जोगेश्वरी मंदिरात, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंडमध्ये जाऊन कुंभारवाड्यातून परटवणे फगरवठार येथून परत फिरून निशाण वरच्या आळीतून, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनीच्या पारावर होळी घेण्यासाठी आली.
रात्री ११.३० वाजता ढमालनीच्या पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात आले. तेथून राजिवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी मुस्लीम मानकरी काद्र्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देऊन गळाभेट होऊन तेथे धूळवड साजरी करण्यात आली.
फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडली. तत्पूर्वी भैरी भेटीला जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबाची पालखी आली होती. सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबाची पालखी श्री भैरी मंदिरातून बाहेर पडली. दोन्ही पालख्यांची भेट श्री भैरी मंदिराच्या प्रांगणात झाली.