रत्नागिरी : मुस्लिम मोहल्ल्याने घडवला हिंदू तरूण, देव-अल्लाहसमोर मनोभावे नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:24 PM2018-09-03T17:24:01+5:302018-09-03T17:29:28+5:30
तेलापासून ते अन्नापर्यंतची सर्व व्यवस्था घराजवळील मुस्लिम समाजातील कुटुंबियांनी केली. त्यांच्या जडणघडणीतूनच मी घडलो, त्यांच्यामुळेच आज मी या उंचीपर्यंत पोहोचल्याची भावना रत्नागिरीतील उद्योजक मनोहर ढेकणे यांनी व्यक्त केली.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : घरात अठराविश्व दारिद्र्य...एकवेळ अन्न सोडाच... पण घरातील चूल पेटेल की नाही अशी दिवसाची सुरूवात व्हायची...याच काळात अगदी केसावरील तेलापासून ते पोटातील अन्नापर्यंतची सर्व व्यवस्था घराजवळील मुस्लिम समाजातील कुटुंबियांनी केली. त्यांच्या जडणघडणीतूनच मी घडलो, त्यांच्यामुळेच आज मी या उंचीपर्यंत पोहोचल्याची भावना रत्नागिरीतील उद्योजक मनोहर ढेकणे यांनी व्यक्त केली.
मुस्लिम कुटुंबियांच्या या ऋणात मी कायम राहणे पसंत करणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. मुस्लिम समाज किती चांगला आहे, याची बीज बालपणातच रोवली गेल्याने ते देव आणि अल्लाह या दोघांसमोरही तितकेच मनोभावे नतमस्तक होत असतात.
मनोहर सखाराम ढेकणे हे रत्नागिरीतील मोबाईलच्या क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. लांजा तालुक्यातील गवाणे येथील करंबेळेवाडीत त्यांचे घर आहे. या वाडीत १० घरे असून, या वाडीशेजारीच ४५ घरांची मुस्लिमवाडी आहे. आई-वडील, तीन बहिणी, धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण कसे जगलो, कसे वाढलो हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते.
मनाच्या कोपऱ्यात इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंठही दाटून आला होता. घरात अन्न शिजलेच नाही, असे कळल्यावर मुस्लिम समाजातील महिला आपल्या घरी घेऊन जात आणि जेवण देत असत. आपलंच लेकरू समजून ती मंडळी आपुलकीने जवळ घेत होती. सणाच्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी दिलेला खाऊदेखील देत असत. या समाजामुळेच आपण कधी उपाशी राहिलो नसल्याचे ते सांगतात.
पहिली ते चौथीपर्यंतचे सारे शिक्षण गवाणे येथीलच शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत लांजा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. वडिलांच्या व्यवसायातून मिळणाºया पैशावरही घर चालणे त्यावेळी मुश्कील होते. दारिद्र्य म्हणजे काय, हे आपण अगदी जवळून पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
परिस्थितीमुळे पूर्ण शिक्षण घेता आले नाही. शैक्षणिक कार्यकालात चुलत्यांची खूप मदत झाल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यानंतर ते मुंबईत गेले. त्याठिकाणी रेडिओ दुरूस्तीचे शिक्षण घेऊन आपण रत्नागिरीत आलो. बॉम्बे स्टोअर्समध्ये साडेसात वर्ष काम केलं. त्याठिकाणी प्रामाणिकपणा आणि चिकाटी हे सुरेश व शरद सरदेशपांडे यांचे संस्कार अंगिकारल्याचे ते सांगतात.
सुरूवातीच्या काळात मोबाईल टॉवरचे कामही त्यांनी केले. त्याचवेळी त्यांनी मोबाईल दुरूस्तीचे शिक्षण घेतले. त्यानंतर सन २००१मध्ये रत्नागिरीत चार सायबर कॅफे त्यांनी चालविण्यासाठी घेतले. तीन वर्षे हा व्यवसाय केल्यानंतर वेगळी दिशा स्वीकारण्याचा निश्चय केला. दुनिया वेगाने पुढे जात आहे, त्यामुळे संभाषणाचे प्रकारही बदलत आहेत.
मोबाईल ही गरजेची वस्तू बनणार असल्याचे लक्षात येताच २००३मध्ये ह्यनॅशनल मोबाईलह्ण हे दुकान विकत घेतले. त्यावेळी खिशात एकही पैसा नव्हता म्हणून बँकेकडून कर्ज घेतले आणि ओळखीच्या माणसांकडून त्यांनी फर्निचर करून घेतले. तरीही माल भरण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली. माल भरायलाही पैसे नसल्याने केवळ दुकान उघडून त्याकडे पाहण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्याचवेळी प्रकाश जैन यांनी मार्ग दाखवला.
नातेवाईक, मित्र यांच्याकडून पैसे गोळा केले आणि मोबाईलच्या दुकानाचा श्रीगणेशा केला. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गरिबी जवळून पाहिलेली असल्याने दुसऱ्या गरिबाच्या खिशातून काही घ्यायचे नाही, हे तत्व त्यांनी आजही पाळले आहे. रेडिओ दुरूस्ती किंवा मोबाईल दुरूस्तीसाठी आलेल्या माणसाकडे पैसे नसतील तर त्याच्याकडून पैशाची सक्ती कधीच केली नाही.
जेवढी मेहनत तेवढे यश
माणूस घडतो तो आत्मविश्वासाने, त्यासाठी एक माध्यम म्हणजे चिंतन. आत्मविश्वास हाच ईश्वर आहे. जन्माला आलेल्या माणसाला दुनियादारी माहीत नसते. आई-वडील यांच्यावर श्रद्धा ठेवल्यास यश नक्कीच मिळते. सर्व देव एकच आहेत. मुस्लिम समाजाने मला आज वाढवले नसते तर हे दिवस मी पाहू शकलो नसतो. हा समाज वाईट नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे.
- मनोहर ढेकणे
गॅरेजमध्येच झोप
मुंबईत पाडळकर यांच्या घरी ते राहत होते. त्यावेळी परळ-दादर असा क्लास सुरू होता. हे कुटुंब वारकरी असल्याने त्यांचे साधेच राहणीमान होते. त्यांचा विडीचा व्यवसाय असल्याने घरात सर्वत्र सामानच होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी जागाच नसायची. घराच्याच मागे गॅरेज होते. जेवण झाल्यावर तेथे जावून रद्दीचा पेपर अंथरून त्यावर झोपायला लागे. तरीही जिद्दीने रेडिओ दुरूस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केले.
अल्लाहची तसबीर जीवापाड जपलीय
मुस्लिम समाजातील व्यक्तीचा सायबर कॅफे चालविण्यासाठी घेतला असता, त्याच्या एका सामानाच्या खोक्यात अल्लाहची तसबीर, पवित्र माळ सापडली. ती कपाळाला लावून जपून ठेवली. लहानपणापासूनच या समाजाबद्दल आदराची भावना असल्याने या वस्तू आपण जीवापाड जपल्या आहेत. ढेकणे यांच्या दुकानात स्वामी समर्थ, गजानन महाराज, लक्ष्मी यांच्याबरोबरच अल्लाहची तसबीर आणि माळेचे पूजन ते नित्यनियमाने करतात.
कुराणाचेही पठण
देवतांबरोबरच त्यांची पीर बाबरशेख यांच्यावरही तेवढीच श्रद्धा आहे. विशाळगड दर्ग्याचे मनोभावे पूजन ते करतात. त्यांच्या घरी मराठीतून कुराणाची प्रत असून, त्याचे ते वाचनही करतात. तशीच त्यांच्याकडे भगवद्गीताही आहे.
भाकरीबरोबरही काही नाही
शाळेत जाताना आई कधीकधी भाकरी आणि त्याच्यासोबत काहीतरी द्यायची. काहीवेळेला नुसतीच भाकरीही द्यायची. ही भाकरी घेऊन लांजातील एका हॉटेलमध्ये ते बसले होते. मात्र, ती भाकरी बुडविण्यासाठी काहीच नसल्याने पाण्यात बुडवून भाकरी खाण्यास त्यांनी सुरूवात केली. तेथे आलेल्या एका इंजिनिअरने ते पाहून वेटरला सांगून मिसळ दिली.
मुस्लिम महिलांच्या पैशातून परदेशात
परदेशात जाण्याचा आपल्याला योग आला. पण त्यावेळी पैसे नव्हते, त्यामुळे जाणे जवळजवळ रद्दच झाले होते. ही गोष्ट वाडीतील मुस्लिम समाजातील महिलांना कळली. त्यांनी तातडीने घरी येऊन आपल्याकडील पैसे, दागिने देऊन मदतीचा हात दिला. त्यांच्या या मदतीमुळेच परदेशात जाण्याचा योग आल्याचे ते अभिमानाने सांगतात.
मिसळ खाण्यासाठीही पैसे नसायचे
एखाद्यावेळी आईने डबा दिला नाही तर ती आपल्या गाठी असलेले ५० पैसे द्यायची. त्यावेळी एका हॉटेलमध्ये मिसळ आणि दोन पाव ५० पैशाला मिळायचे. पण ते हॉटेल शाळेपासून खूप दूरवर होते. तर शाळेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हॉटेलात तीच मिसळ एक रूपयात मिळायची. त्यामुळे दूरवरच्या हॉटेलात जाऊन असलेल्या पैशातून मिसळ खावी लागत असे.
सायकलचे स्वप्न अधुरे
चौथीपुढील शिक्षण घेण्यासाठी गवाणेतून चालत लांजाला यावे लागत असे. नेहमी या रस्त्यावरून चालताना एका सायकवाल्याशी त्यांची ओळख झाली. ती सायकल मला विकत द्याल का, असे त्यांनी विचारताच हो म्हणून सांगितले. त्यांनी वडिलांना ते सांगितले. त्यावर वडिलांनी बाळा, माझी सायकल घेण्याएवढीही परिस्थिती नाही रे असे सांगताच सायकल घेण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.
घरातला भांड्यांचा स्टॅण्ड दिला
रेडिओ दुरूस्तीचे काम करत असताना ग्राहकांचे येणारे सामान ठेवण्यासाठीही काही नव्हते. सगळं सामान पेपर अंथरुन त्यावर ठेवलेले असे. ही गोष्ट ढगे या व्यक्तीने पाहिली. त्यांनी घरातील भांड्यांचा स्टॅण्ड आणून दिला आणि यावर हे सामान ठेव, असे सांगितले. माझ्या या वाटचालीत आत्या आणि मावस बहिणीचेही योगदान मोठे असल्याचे ते सांगतात.