रत्नागिरी : कोकण विभागीय मंडळासमोर उत्तरपत्रिकांची होळी, कृती समिती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:44 PM2018-02-23T13:44:10+5:302018-02-23T13:47:40+5:30
विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या त्वरित घोषित करून त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून १०० टक्के पगार सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समितीच्यावतीने गुरुवारी शासनाचा निषेध करण्यासाठी येथील कोकण विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी : विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या त्वरित घोषित करून त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून १०० टक्के पगार सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समितीच्यावतीने गुरुवारी शासनाचा निषेध करण्यासाठी येथील कोकण विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करण्यात आली.
२० फेब्रुवारीपर्यंत सर्व विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या कोणत्याही परिस्थितीत घोषित केल्या जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री यांनी दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही ते अद्याप पाळले नाही. त्यामुळे कृती समितीने येथील कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला.
यावेळी विभागीय मंडळाचे पदाधिकारी शेख यांना निवेदन देऊन उपस्थित विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतिम मार्ग म्हणून २१ फेब्र्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेला काळ्या फिती लावून काम करण्यास सुरूवात केली आहे. यापुढेही उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ फेब्रुवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर समितीतर्फे २७ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे.
या आंदोलनावेळी कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र जाधव, सुकुमार शिंदे, अमोल यादव, राहुल यादव, सुयोग तांबे, सानिका शेलार, अनिकेत गुरव, नीलेश कातकर, अभिजीत सुर्वे, परमेश्वर केंद्रे, प्रकाश फराटे, संदीप कुराडे, हिंदुराव कांबळे उपस्थित होते.