रत्नागिरी : मानकऱ्यांची खूणही पालखीने शोधली, पूर येथील शिमगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:14 PM2018-03-12T13:14:47+5:302018-03-12T13:14:47+5:30
संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.
कोकणात शिमगोत्सवानंतर खुणा काढण्याची प्रथा पूर्वापार रूढ आहे. खुणा काढण्याच्या दिवशी उत्सवाला उधाण येते. शिमगोत्सवात कोणतीही चूक न होता, कार्य निर्विघ्नपणे पार पडले याची साक्ष ग्रामदेवता यावेळी पटवून देते. त्याचप्रमाणे पूर येथील ग्रामदेवतेची पालखी खुणा काढण्याच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात नाचविण्यास प्रारंभ करण्यात आला. पालखी लपवलेल्या खुणेचा शोध घेत होती, यावेळी सर्व भाविकांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्या होत्या.
पन्नास मिनिटांच्या कालावधीत पालखीने खूर मारून खूण शोधून काढली. यावेळी भाविकांनी ग्रामदेवतेच्या नावाने एकच जल्लोष केला. प्रमुख झेपले व वेले मानकऱ्यांच्या उपस्थितीत ही खूण बाहेर काढण्यात आली.
हा क्षण पाहण्यासाठी स्थानिक व मुंबईकर भाविकांची एकच गर्दी झाली होती. यानिमित्त आयोजित जत्रेठिकाणी दुकानदारांनी सकाळपासूनच दुकाने थाटली होती. त्यामुळे मिठाई, शीतपेय, शोभेच्या वस्तू असलेल्या दुकानांनी संपूर्ण परिसर फूलून गेला होता.
खुणा काढून झाल्यानंतर पालखी नाचवत वाजतगाजत मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर रूपे काढून शिमगोत्सवाची सांगता झाली. पूर ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन यावेळी घडले. शिमगोत्सव शांततेत पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे.