रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:13 PM2017-11-15T12:13:18+5:302017-11-15T12:17:18+5:30
थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे.
रत्नागिरी : थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार असून, मार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.
वीजबिल वसुलीत कायम अग्रेसर राहणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात २३७२ शेतकरी हे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे मार्च२०१७ अखेरीस १० लाखांच्या वीजबिलाची थकबाकी असून, एप्रिलनंतर दिलेल्या चालू त्रैमासिक बिलापोटी ८ लाख ९४ हजार ९४ रुपये येणे आहे. चालू बिले न भरल्यास १५ नोव्हेंबरपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील या २३७२ थकबाकीदार कृषी पंपधारकांकडे मार्च २०१७ अखेरीस मूळ थकबाकीचे ९ लाख ३९ हजार ८७ रुपये, व्याजाचे ४८ हजार १७८ रुपये तर दंडापोटी १० हजार ६६ रुपये अशी एकूण ९ लाख ९७ हजार ३३१ रुपये थकबाकी आहे.
एप्रिलनंतरच्या चालू बिलापोटी ८ लाख ९४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत चालू बिले भरणाऱ्यांनाच कृषी संजीवनी योजेनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या व दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च २०१७ अखेर ३० हजारापेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी फेडण्यासाठी पाच समान हप्ते दिले जाणार आहेत.
हा प्रत्येक हप्ता २० टक्के रकमेचा असून, पहिला हप्ता डिसेंबर २०१७, दुसरा मार्च २०१८, तिसरा जून २०१८, चौथा सप्टेंबर २०१८ ला तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यंत भरावा लागणार आहे.
या प्रत्येक हप्त्यांसोबत पुढील येणारे बिल भरणेही क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडे तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी १० टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत.
संपूर्ण हप्ते व चालूबिलाचा भरणा डिसेंबर २०१८पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर आकारलेले दंड व व्याज माफ होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
सहकार्य करावे
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी कृषीपंपाची चालू बिले भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ मध्ये सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कोकण विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी केले आहे.