रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फुट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:07 PM2019-12-12T15:07:09+5:302019-12-12T15:07:48+5:30
काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.
रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होत आहे. मात्र, या निवडणुकीवरून रत्नागिरी काँग्रेसमध्ये ठिणगी पडली असून, काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्ष राकेश चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांनी व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून तडकाफडकी पदमुक्त केले आहे, तर शहर ब्लॉक अध्यक्ष म्हणून मला पदावरून हटविण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षानाच आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी की, महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, याबाबत जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नव्हता. आपण प्रदेशाच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊया, असे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी आपल्याला सांगितले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीत आलेल्या भोसले यांना त्याबाबत विचारणा केली असता पक्ष निरीक्षक रत्नागिरीत येऊन त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे चव्हाण म्हणाले.
मात्र, नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची १२ डिसेंबर ही अखेरची तारीख असल्याने निरीक्षक येणार कधी व निर्णय घेणार कधी असा प्रश्न असल्याने आपण आधी उमेदवारी अर्ज दाखल करुया व नंतर त्याबाबत निर्णय घेऊया, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर रत्नागिरी शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली व प्रदेशशी बोलून निर्णय घेऊया, असे आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु नगराध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय न होता थेट मला शहर ब्लॉक अध्यक्षपदावरून पदमुक्त केल्याचे पत्र पाठविले गेले. त्याचवेळी काँग्रेसने राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र ही जिल्हाध्यक्षांनी प्रसिध्द केले.
मला पदमुक्त करण्याचे पत्र हा अन्याय असून, मला या पदावरून काढण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना नाही, असे सांगून चव्हाण यांनी थेट जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश शहा यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने आपणास हटविण्याचा मनमानी निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला आहे. याबाबत चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली असून, १५ दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश शहा यांच्या उमेदवारीला विरोध केला म्हणून मला पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र म्हटले आहे व प्रदेश अध्यक्षांनीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
विजय भोसले यांच्यावर आरोप
जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले सांगत असतील तर त्यांनी तशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवी होती. मग मलाच पदमुक्त केल्याचे पत्र पाठविताना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे का कळविले जाते. भोसले हे काही ठराविक जणांचेच ऐकतात व कारभार करतात. मला पदमुक्त करणे, हा त्याचा परिपाक आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.