रत्नागिरी : एलईडी मच्छीमारीबाबत सुरेश प्रभूंचे बंदीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:45 PM2018-03-02T16:45:22+5:302018-03-02T16:45:22+5:30
एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत दिले आहेत.
रत्नागिरी : एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत.
याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत दिले आहेत. राज्यांची सागरी हद्द ही १२ऐवजी २५ सागरी मैल करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
२२ फेब्रुवारी २०१८ रोजी सिंधुदुर्गचे सुपुत्र व केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या दालनात सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव एस. के. पट्टनाईक, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडन्ट भीमसिंह कोठारी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रविकिरण तोरसकर, इतर प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारी वादासंदर्भात कृषी मंत्रालय, तटरक्षक दल, केंद्रीय वाणिज्य खाते यांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक तातडीने बोलावण्यात यावी, अशी विनंती सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली होती.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शासनातर्फे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एलईडी लाईट मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, या विषयावर चर्चा झाली.