रत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:45 PM2018-05-24T17:45:51+5:302018-05-24T17:45:51+5:30

सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सदस्यांनी सभात्याग केल्याने सभापती मेघना पाष्टे यांनी ही सभा स्थगित केली.

Ratnagiri Panchayat Samiti meeting held for the protest against the development of the Govt | रत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग

रत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचा सदस्यांचा आरोप

रत्नागिरी : सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले.

गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सदस्यांनी सभात्याग केल्याने सभापती मेघना पाष्टे यांनी ही सभा स्थगित केली.

आचारसंहितेच्या कालावधीत कामे करणाऱ्या कोतवडे ग्रामपंचायतीची तसेच सुरुची जिवंत झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या वनखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली.

तालुक्यातील मौजे कोतवडे, ढोकमळे येथील सुरुच्या झाडांची ठेकेदाराकडून कत्तल केली जात असल्याचे सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरुच्या ५५१ झाडांचे मूल्यांकन केवळ ८४ हजार रुपये केले.

यावेळी तोडण्यात आलेले एकही झाड सुके नसून, १५६ सुरुची जिवंत झाडे तोडण्यात आली आहेत. वनखात्याचे अधिकारी परजिल्ह्यातील ठेकेदाराला हाताशी धरुन काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या झाडांच्या मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी गजानन पाटील व इतर सदस्यांनी केली. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी सुरु असून, ती लवकरच पूर्ण करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

आचारसंहितेच्या कालावधीत कोतवडे ग्रामपंचायतीने रस्त्यांची ४ कामे करुन लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. ही कामे आचारसंहितेच्या कालावधीत करुन संबंधितांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सभापतींनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.

सभापतींनी सूचना देऊन ग्रामसेवक आजच्या सभेला उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल सदस्य पाटील यांनी ग्रामसेवक या सभेला उपस्थित का राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर गटविकास अधिकारी जमदाडे यांनी ग्रामसेवकाला लेखी दिले नसल्याने ते नियमानुसार उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यावर संतप्त झालेले गजानन पाटील, उत्तम सावंत यांनी व अन्य सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी सदस्य पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपण आतापर्यंत ग्रामसेवकांना अन्य ग्रामपंचायतींचा चार्ज देण्याचे काम नियमात केलेत का? त्याबाबतचा नियम सांगा, असा प्रतिप्रश्न केल्याने गटविकास अधिकारी गोंधळून गेले. त्यांना दोन ग्रामपंचायतीतील नियमच माहिती नसल्याने त्यांनी थातूरमातूर उत्तर दिले. त्यावेळी सदस्यांनी आक्रमक होऊन गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

काहीवेळाने सदस्य सावंत यांनी पुन्हा ह्यत्याह्ण ग्रामसेवकाला सभागृहात बोलावलेत का, अशी विचारणा केली असता गटविकास अधिकाऱ्यांनी नाही म्हटले. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी ही सभा तहकूब केली.

गटविकास अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त

आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सदस्य तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतानाच गटविकास अधिकारी जमदाडे हे मोबाईलमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना तालुक्यातील समस्यांपेक्षा मोबाईलमध्ये जास्त रस असल्याची कुजबूज सभागृहात सुुरु होती.

सदस्य आक्रमक

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायतीच्या प्रश्नावरूनच आजची सभा वादळी ठरली. कोतवडे भागातील सुरुच्या बनांची केली जाणारी कत्तल आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पंचायत समिती सदस्य आक्रमक झाले होेते.

हा मुद्दा चर्चिला जात असतानाच दुसरीकडे आचारसंहितेच्या काळात रस्त्याची कामे झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले. ग्रामसेवकांनी सभेकडे पाठ फिरवल्याने सदस्य आणखीनच आक्रमक झाले.

Web Title: Ratnagiri Panchayat Samiti meeting held for the protest against the development of the Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.