रत्नागिरी : कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे, चिपळुणात जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:53 PM2018-07-03T13:53:29+5:302018-07-03T13:55:48+5:30
शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
चिपळूण : पेढे - परशुराम येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आहेत. येथील देवस्थान ट्रस्टने अन्याय केला आहे. कुळांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे, शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कुळांना १०० टक्के मिळालाच पाहिजे. नाही तर चौपदरीकरणाच्या कामाची एक वीटही लावू देणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांसाठी चिपळुणात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन देण्यात आले. पेढे परशुराम या दोन गावातील ग्रामस्थ व महिला आपल्या घराला कुलूप लावून जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
संघर्ष समिती पेढे परशुरामवासियांनी परशुराम येथून फरशीतिठामार्गे बाजारपूल, चिंचनाका, प्रांत कार्यालयापर्यंत आपल्या न्याय हक्कासाठी जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे २ हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये आमदार सदानंद चव्हाण, खेडचे आमदार संजय कदम, मनसे खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम सहभागी झाले होते.
यावेळी संघर्ष समिती पेढे परशुरामचे उपाध्यक्ष सुरेश बहुतुले यांनी सांगितले की, ७/१२ उताऱ्यावरील श्री देव भार्गवराम व खोतांची नावे कमी करुन त्या ठिकाणी कुळांची नावे मालक म्हणून लावावीत. शासनाने संपादित केलेल्या जमिनीला १०० टक्के मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.
चोख पोलीस बंदोबस्त
सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून परशुराम मंदिरापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत सुमारे ५ किमीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. दुपारी २.३० पर्यंत मोर्चातील एकाही ग्रामस्थाने आपली जागा सोडली नाही. मोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.