रत्नागिरी : आंबा निर्यात मँगोनेट प्रणालीव्दारे नावनोंदणीसाठी अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:28 PM2018-01-04T16:28:14+5:302018-01-04T16:29:35+5:30
आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
रत्नागिरी : आंबा परदेशात निर्यात व्हावा, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी नव्याने नोंदणी सुरू झाली असली तरी अद्याप त्यासाठी शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हाभरातून केवळ ४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
शेतकºयांना परदेशी बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी शासनाने २०१४-१५पासून मँगोनेट प्रणाली सुरू केली. यावर्षीदेखील मँगोनेटसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून मँगोनेट प्रणालीअंतर्गत नोंदणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता सुरूवातीला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आली असून, ती ३१ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी मँगोनेट कार्यशाळा आयोजित करून आंब्याचे उत्पादन ते निर्यात याबाबतची माहिती देण्यात येते. तंत्रज्ञान पोहोचवण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आंबा नाकारला जाणार नाही, याबाबत घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबतही सूचना देण्यात येते.
दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. यावर्षीही नूतन नोंदणीबरोबर प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन केले आहे. अमेरिका तसेच युरोपियन देशासाठी आंबा निर्यात करण्याकरिता ३१ जानेवारीपर्यत नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छूक आहेत, त्याची माहिती आॅनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यात येत आहे. आंब्याच्या झाडाचे खत व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार करून टप्प्याटप्प्याने नोंदी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असून टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बदल संभवतात. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. आंब्याच्या निर्यातवाढीतून शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती व्हावी, यासाठी मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत मँगोनेटसाठी नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गतवर्षी १८६२ शेतकऱ्यांनी मँगोनेटसाठी पुनर्नोंदणी केली होती, तर केवळ १९३ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केल्यामुळे एकूण २ हजार ५५ शेतकऱ्यांनी मँगोनेट प्रणालीव्दारे नोंदणी केल्याने १६९३ हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. सुरूवातीच्या दोन वर्षांत मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातच झाली नव्हती.
गतवर्षी (२०१७) मध्ये जिल्ह्यातून १६९२ किलो आंबा परदेशी निर्यात झाला होता. कुवेतमध्ये ४२ किलो, तर रशियामध्ये १६५० किलो आंबा निर्यात झाला होता. गतवर्षीपासून मँगोनेटव्दारे निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी निर्यातीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे.