रत्नागिरी : पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:54 PM2018-04-10T17:54:58+5:302018-04-10T17:54:58+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती तत्काळ उठवली जावी व सध्याचा ठेका रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे योजनेचे काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.
या मागण्यांचे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश नगर परिषद जावक क्र. १८६ / ३३३०, दि. ८ एप्रिल २०१७ अन्वये ठेकेदाराला देण्यात आला आहे. राजकीय साठमारीमध्ये या योजनेला कोकण विभाग आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती तत्काळ उठवावी व रत्नागिरीची सुधारित नळपाणी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये योजनेवरील स्थगिती तत्काळ उठविणे, सध्याचा ठेका रद्द करून जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत योजनेचे काम करणे, योजनेची मूळ उद्दिष्टे, लाभ, हाती घ्यावयाची कामे व योजनेचा भविष्यात किती वर्षे लाभ होणार आहे, कामाची गुणवत्ता जाहीर करणे, यांचा समावेश आहे. राज्यात सेना भाजपची सत्ता आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत, मग योजनेला विलंब का, असा सवाल वाडेकर यांनी केला आहे.
पाण्याचा ठणठणाट
सुधारित पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रत्नागिरीकरांच्या पाणी समस्येत अधिकच वाढ झाली आहे. पाणी योजना राजकीय साठमारीत सापडल्याने शहरातील पाणी समस्या गंभीर बनली आहे, असे अशोक वाडेकर म्हणाले.