रत्नागिरी : मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:12 PM2018-08-04T17:12:30+5:302018-08-04T17:15:52+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. यात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याची रक्कम वसुल करण्याचीही सुचना केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्याचौपदरीकरणाचे काम मागील वषार्पासून सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांना काही अटी व शर्ती वर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे कार्यारंंभ आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षापर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करावी, असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजविण्याच्या रक्कमेचा ही समावेश करण्यात आला आहे.
पावसाळ्यापुर्वी या राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजविणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. परंतु ठेकेदारांकडून याची गंभीर दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेक प्रवाशांना आपले प्राणही गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत.
याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत अनेकवेळा बैठका घेऊन संबंधित ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. र
स्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक तो निधी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दिल्यानंतरही खड्डे बुजविले जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात जनतेमध्ये तसेच प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या महामार्गावर पडलेल्या खड्डयांप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले आहेत. स्थानिकांकडून तक्रारीही प्राप्त होत असल्याचे वायकर यांनी या पत्रान नमूद केले आहे. त्यामुळे यापुढे महामार्गावर पडलेले खड्डे विहीत वेळेत भरण्यासाठी स्वतंत्ररित्या ठेकेदारांची नेमणुक करण्यात यावी.
या कामासाठी येणार स्वतंत्ररित्या निधीची तरतूद न करता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या रक्कमेतून वळती करण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.