चिपळुणातील रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचे सूप वाजले!
By admin | Published: May 10, 2016 10:15 PM2016-05-10T22:15:50+5:302016-05-11T00:09:53+5:30
वन्समोअरच्या नाऱ्याने सांगता : रत्नागिरीभूषण पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्राने सन्मान
चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ची सांगता वन्समोअरच्या नाऱ्याने उत्साही वातावरणात सुदेश भोसले यांच्या बहारदार मैफलीने झाली. संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण यांनी पुन्हा एकदा हा महोत्सव चिपळूणमध्ये भरवावा, अशी वन्समोअरची मागणी केली व हा महोत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कलाकार, कर्मचारी व नागरिकांना धन्यवाद दिले.
रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची सांगता सोमवारी रात्री झाली. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, या महोत्सवाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया वन्समोअरच्या आहेत. गावागावात चर्चा सुरु आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हा कार्यक्रम चिपळूणला दिला, त्यामुळे चिपळूणकरांचा आनंद गगनाला मिळाला. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. प्रशासनाने एवढी मोठी जबाबदारी पार पाडली. सर्वांनी प्रचंड उन्हात जबाबदारी ओळखून काम केले. पोलिसांनीही चांगले सहकार्य केले. हा परिवर्तनाचा ‘न भुतो न भविष्यती’ असा कार्यक्रम झाला. सर्व पक्षांच्या लोकांनी चांगली साथ दिली. त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच, अशी कृतज्ञता आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.
खासदार विनायक राऊत म्हणाले, पालकमंत्र्यांनी चिपळूणकरांची इच्छा पूर्ण केली आहे. लोकभावनेची जाण असलेले शासन आणि पालकमंत्री हे एकत्र आल्यावर काय घडते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण कोकणाला अभिमान वाटावा, असा महोत्सव भरवून चिपळूणकरांना चांगली संधी दिली. असे महोत्सव वारंवार झाले पाहिजेत, असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र वायकर व खासदार विनायक राऊत यांचा आमदार चव्हाण यांनी सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांचा सत्कार स्वागत समिती अध्यक्ष जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केला. नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, माजी महापौर श्रध्दा जाधव यांचा सत्कार तहसीलदार वृषाली पाटील यांनी केला. दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, ग्लोबलचे राम रेडीज, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रकाश सावंत व पोलीस अधिकारी यांचा सत्कार पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते करण्यात आला. ग्लोबल चिपळूण व विविध संस्थांतर्फे पालकमंत्री वायकर व आमदार चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री वायकर यांनी रत्नागिरी भूषण पुरस्कार प्राप्त २० मान्यवरांचा पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ११ हजार रुपये रोख देऊन गौरव केला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात प्रबोधनकार ठाकरे कलादालन व त्यांचे तैलचित्र उभारण्यासाठी पालकमंत्री वायकर यांनी १ लाख रुपयांची देणगी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली. सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. (प्रतिनिधी)
पर्यटन महोत्सवात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते दापोलीच्या तहसीलदार कल्पना गोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम गोलमडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, सचिन कदम व्यासपीठावर उपस्थित होते.