रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:31 AM2018-01-12T11:31:55+5:302018-01-12T11:36:30+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाºयांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ८४५० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे.
जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याच्या मोहिमेचा दोन महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले आहेत.
बंधारे उभारण्यासाठी खासगी कंपन्यांनी जिल्हा परिषदेला साहित्याचा पुरवठा केला आहे. त्यामुळे शासनाचा एकही पैसा खर्च न करता खासगी कंपन्यांकडून देण्यात आलेल्या साहित्याचा वापर काही ठिकाणी बंधारे उभारण्यासाठी करण्यात येत आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३६६९ बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये राजापूर तालुक्याला १०१० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना केवळ २४५ बंधारे पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याला १३०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना ४४१ बंधारे उभारण्यात आलेले आहेत.
दापोली तालुक्याला १०६० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ७४२ बंधारे उभारले आहेत. अशा प्रकारे बंधाऱ्यांची कामे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावे, वाड्यांवर सुरु आहेत. या बंधाऱ्यांमध्ये वनराई बंधारे - ८००, विजय बंधारे - ११३६ व कच्चे बंधारे - १७३३ अशी वर्गवारी आहे.
या बंधाऱ्यांच्या पाण्यावर दरवर्षी भाजीपाला निर्मिती करुन उत्पन्न घेण्यात येते. त्यामुळे बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकरी आर्थिक फायदा घेतात. त्याचबरोबर या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने त्यामुळे तेथे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते.
जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ओहोळ, नाले, नद्या नसल्याने त्या ग्रामपंचायती बंधारे कुठे उभारणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे पाणी आटण्याच्या स्थिती असल्याने बंधाऱ्यांची उद्दिष्टपूर्ती होणे अशक्य आहे.