रिफायनरी विरोध : कोकणातील आमदार एकवटले, नागपुरात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:38 PM2017-12-19T17:38:12+5:302017-12-19T17:41:53+5:30
राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सर्वच आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सर्वच आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली.
राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. रिफायनरी विरोधातील संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली माध्यमातून नागपूरच्या यशवंत स्टेडीयम या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, सदानंद चव्हाण, उदय सामंत, वैभव नाईक यांच्यासह अजित यशवंतराव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, हा प्रकल्प आणि याच तालुक्यात होत असलेला अणुउर्जा प्रकल्प या दोन प्रकल्पांमध्ये असलेले अंतर हे नियमानुसार पुरेसे नसल्याने भविष्यात दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. रिफायनरी प्रकल्प शिवसेनेने आणला असला तरी राजकारण बाजूला ठेऊन आता हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन. विधानसभेतदेखील आवाज उठवेन, तसेच या प्रकल्पाविरोधात कुठेही यायची आपली तयारी आहे, असा शब्द त्यांनी दिला.
त्याचबरोबर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर शिवसेना ग्रामस्थांच्या बाजूने राहिल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शिवसेना प्रकल्पविरोधात भूमिका घेईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेना प्रकल्पविरोधात भूमिका घेईल, असेही यावेळी सांगण्यात आले.