रत्नागिरी जिल्ह्यातील १५ लाख सातबारा दुरूस्त, दीड वर्षांपासून काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:21 PM2018-02-23T12:21:14+5:302018-02-23T12:26:05+5:30
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमधील दुरूस्तीचे काम सुरू आहे. ७३ टक्के उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. मात्र, उर्वरित २७ टक्के दाखले क्लिष्ट असल्याने त्या दुरूस्तीत जिल्हा प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागत आहे. कामाचा निपटारा करण्यासाठी सध्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्यांमधील दुरूस्तीचे काम सुरू आहे. ७३ टक्के उताऱ्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे. मात्र, उर्वरित २७ टक्के दाखले क्लिष्ट असल्याने त्या दुरूस्तीत जिल्हा प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागत आहे. कामाचा निपटारा करण्यासाठी सध्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत.
शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा उतारे आॅनलाईन केले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाले असले तरी मूळ दाखल्यातील दुरूस्ती आॅनलाईन दाखल्यांमध्ये झालेले नाही. त्यातच संगणकीकरणासाठी शासनाकडून आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करता येत नसल्याने नागरिकांची अडचण होत होती. राज्यभर ही स्थिती होती. उताऱ्यांमध्ये काही फेरफार झालेले नसल्याने जनतेचे जमिनीविषयक कामेही खोळंबली.
मात्र, फेब्रुवारी २०१८ मध्ये सातबारा उताऱ्यांच्या दुरूस्तीचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी एडिट मॉड्युल हे दुरूस्तीसाठी असलेले नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले. त्यायोगे दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. यासाठी जिल्ह्याला एप्रिल २०१७ अखेरची डेडलाईन देण्यात आली होती. त्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी रात्री उशिरापर्यंत जागून सातबारा दुरूस्तीचे काम करीत आहेत.
मध्यंतरीच्या काळात या कामात कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने तलाठ्यांचा वेळ वाया जात होता. त्यामुळे इतर कामेही खोळंबत होती. सततच्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे अखेर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी लक्ष घालून स्वतंत्र सर्व्हर प्राप्त करून दिल्याने दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे.
मात्र, अजूनही अधूनमधून सर्व्हर डाऊन होण्याची समस्या सतावत असल्याने कामात व्यत्यय येत असतो. आधीच सातबारा उताऱ्यांवर अधिक खातेदारांची नावे असलेला तसेच सर्वाधिक सातबारा उतारे असलेला रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यातच खातेदारांची संख्याही अधिक असल्याने दुरूस्ती करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यात एकूण २० लाख ८४ हजार ८३ सातबारा उतारे आहेत. सध्या यापैकी १५ लाख ३४ हजार ५९२ उताऱ्यांच्या दुरूस्तीचे काम (७३ टक्के) पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ लाख ४९ हजार ४९१ दाखल्यांची (२७ टक्के) दुरूस्ती शिल्लक आहे. या सातबारावर अनेक खातेदार असल्याने दुरूस्तीचे काम अतिशय काम क्लीष्ट आहे. अनेक सातबारा उताऱ्यांवर खातेदारांची नावे जास्त असल्याने त्यात दुरूस्ती करणे अवघड होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आता या शेवटच्या टप्प्यातील कामाचा निपटारा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
२००२ पासून संगणकीकरणाला सुरूवात
सातबारा संगणकीकरणाच्या कामाला २००२ साली तत्कालीन जिल्हाधिकारी जी. टी. बंदरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली. आता सर्व सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले. मात्र, सातबारा उताऱ्यांची संख्या लक्षात घेता त्यात अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे राज्यभरच दुरूस्तीची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी शासनाने नव्याने एडिट मॉड्युल सॉफ्टवेअर तयार केले. त्याद्वारे केवळ दुरूस्तीचे काम करण्यात येते.
अंतिम टप्प्यातील काम क्लिष्ट
ग्रामीण भागात जमिनीसाठी सातबारा उतारा महत्त्वाचा असल्याने नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी दुरूस्तीचे काम वेगाने सुरू आहे. परंतु अंतिम टप्प्यातील २७ टक्के कामच अतिशय क्लिष्ट असल्याने सध्या याकडेच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चावडीवाचन होणार आहे. यात काही दुरूस्ती असेल तर ती अंतिम दुरूस्ती केली जाणार आहे.
अधिक खातेदारांची नावे असलेलस जिल्हा
सातबारांवर अधिक खातेदारांची नावे असलेला रत्नागिरी हा राज्यातील पहिल्या क्रमांकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात २० लाख ८४ हजार खातेदार आहेत. त्यामुळे दुरूस्तीसाठी दीर्घ कालावधी गेला. या दरम्यान जिल्हा प्रशासनाला कनेक्टिव्हीटी ची समस्या मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने असल्याने कामात व्यत्यय येत होता. तसेच सर्व्हर डाऊनची समस्याही सतावत होती. मात्र, जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शासनाकडे स्वतंत्र सर्व्हरची मागणी केल्याने दुरुस्तीच्या कामाला गती आली.
जिल्ह्यात २० लाख ८४ हजार ८३ सातबारा उतारे
जिल्ह्यात एकूण २० लाख ८४ हजार ८३ सातबारा उतारे आहेत. सध्या यापैकी १५ लाख ३४ हजार ५९२ दाखल्यांच्या दुरूस्तीचे काम (७३ टक्के) पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ लाख ४९ हजार ४९१ उताऱ्यांची (२७ टक्के) दुरूस्ती शिल्लक आहे. सातबारा दुरूस्तीचे काम क्लीष्ट असले तरी त्याला प्राधान्य देत लक्ष केंद्रीत केले आहे. दोन महिन्यात हे काम पूर्णत्त्वाला जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.