संगमेश्वर पोलीस ढिम्मच!
By admin | Published: February 2, 2016 11:33 PM2016-02-02T23:33:29+5:302016-02-02T23:33:29+5:30
बालिकेचा खून : आरोपी गजाआड, दोन दिवसांनंतरही कारण गुलदस्त्यातच
देवरुख : घरानजीक खेळत असलेल्या मुलींना वानर आलाय, असे सांगून आपल्या घराकडे बोलावून त्यातील साक्षी नथुराम भायजे (७) या बालिकेचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर धनावडे वाडीतील या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी राघो भानू धनावडे (५५) या वृद्धाची चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, खुनाचे गूढ अद्याप कायम आहे.
निष्पाप बालिकेच्या निर्घृण खून प्रकरणाचा संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत. मात्र, आरोपीने कशासाठी खून केला, नेमके कारण काय? याची उकल अद्याप होऊ शकलेली नसल्याने खुनाचे गूढ कायम आहे. आरोपी राघो धनावडे याने कोयतीने वार करुन निष्पाप बालिका साक्षीला ठार मारल्याची कबुली पोलिसांजवळ दिल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, आरोपी संभ्रमात टाकणारी वेगवेगळी विधाने करीत असल्याचेही संगमेश्वर पोलिसांकडून सांगण्यात येते.
आरोपी साक्षीला कोयत्याने मारल्याचे सांगतो. मात्र, पुरले किंवा पुढे काय केले, याबाबत स्पष्ट काहीच बोलत नाही. तसेच तो म्हणतो की, वानराने तिला नेले, असेही तो बोलत आहे, अशा संदिग्ध विधानांमुळे नेमके कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही.
दरम्यान, मंगळवारी पुन्हा संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक मनोहर चिखले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन खुनाबाबत काही धागेदोरे हाती येतात का? याबाबत प्रयत्न करीत आहेत. मात्र दोन दिवसानंतरही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही.
गावामध्ये या घटनेमुळे तणावाचे वातावरण होते. त्यामुळे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. साक्षीवर सोमवारी ११.३०च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी वाडीतील ग्रामस्थ स्थानिक आणि मुंबईकर यांची बैठकदेखील पार पडली. सोमवारी घटनास्थळी रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी भेटी देऊन पाहणी केली.
दरम्यान, साक्षी या ७ वर्षीय बालिकेचे कुटुंबीय अजूनही धास्तावलेलेच असून, तिच्या बहिणी अजून दु:खातून सावरलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)
वरिष्ठांची नजर : आरोपीसह पोलीस धामापुरात
पळून गेलेला आरोपी पोलिसांनी काही क्षणातच अटक केला. मात्र, त्याच्याकडून गुन्ह्याचे कारण वदवून घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी संगमेश्वर तालुक्यात नजर ठेवून आहेत. असे असताना पोलिसांना अजूनही आरोपीकडून खुनाचे कारण शोधून काढता आलेले नाही. आरोपीला अटक केल्यास दोन दिवस उलटून गेले आहेत. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला पुन्हा धामापूर गावात नेले. मात्र, तेथेही काही हाती लागले नसल्याचे समजते.
वेगवेगळी माहिती
पोलिसांनी आरोपीकडून खुनाचे कारण वदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी राघो हा प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोन दिवसानंतरही पोलिसांची तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही.