स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 07:03 PM2017-09-21T19:03:58+5:302017-09-21T19:06:52+5:30
विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
रत्नागिरी, दि. 21 - विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या आणि स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या श्रीकृष्ण पाटील बाबाला गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
रत्नागिरीतील या श्रीकृष्ण पाटील बाबाला विनयभंगाच्या आरोपावरुन आज सकाळी अटक करण्यात आली होती. येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने त्याच्यावर कारवाई केली. त्यानंतर त्याला दुपारी कोर्टात हजर केले असता त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, या बाबाला वाचविण्यामागे राजकीय लोकांचा हात असल्याचे समजते. मात्र, आता त्याच्यावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची आणि त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. त्यामुळे त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण पाटील बाबाची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. भक्तांना मार्गदर्शन करतानाही हा बाबा शिवराळ भाषा वापरायचा. बुधवारी रात्री उशिरा त्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार मानणारा हा बाबा पोलीस खात्यात नोकरीला होता. रत्नागिरीतल्या झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे. पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मठ स्थापन केला.
पाटीलबाबा तथा पाटीलबुवा याचा एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत होता. या व्हिडिओमध्ये हा बाबा नटून थटून लोकांना सामोरा जात असल्याचे दिसत आहे. त्यात तो महिलांबाबत अर्वाच्च शब्दही वापरत आहे. स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार समजणारा हा बाबा अनेक प्रकारचे दावे करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
त्याआधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सहा संस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. त्याचवेळी दोन महिलांनी पाटीलबाबा व त्याचा सहकारी रावराणे अशा दोघांवर विनयभंग आणि शिवीगाळीची फिर्याद दिली. त्याआधारे या बाबाला बुधवारी मध्यरात्रीनंतर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली होती.