Ratnagiri: मिठगवाणेत पतपेढी फोडून दीड कोटींवर डल्ला, तारण ठेवलेले २०० तोळे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:13 PM2024-05-15T12:13:02+5:302024-05-15T12:14:23+5:30
राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा फोडून चोरट्यांनी सुमारे २०० तोळे सोन्यावर डल्ला मारला. तारण म्हणून ...
राजापूर : तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा फोडून चोरट्यांनी सुमारे २०० तोळे सोन्यावर डल्ला मारला. तारण म्हणून ठेवलेले हे सोने सुमारे दीड कोटी रुपयांचे आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिस अधीक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन तपासकामाबाबत सूचना केल्या आहेत. इतक्या मोठ्या चोरीची घटना गेल्या अनेक वर्षात प्रथमच घडली असून, त्यामुळे जिल्हा हादरला आहे.
छोट्या छोट्या व्यवहारांसाठी ग्रामीण भागातील लोकांना पतपेढ्यांचा आधार होताे. मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढी ग्रामस्थांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सोनेतारण व्यवहार होतात. मंगळवारी सकाळी ही शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाला शाखेचा कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली. शाखा व्यवस्थापकांनी तत्काळ नाटे सागरी पोलिस स्थानकासी संपर्क साधून तात्काळ तक्रार दाखल केली.
सागरी पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीही घटनास्थळाला भेट दिली. रत्नागिरी येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल होती.
या शाखेतील सोने ठेवलेली तिजोरी चोरट्यांनी फोडली असून, त्यातील जवळपास २०० तोळे चोरल्याची तक्रार देण्यात आली आहे. रोख रक्कम ठेवलेली दुसरी तिजोरी मात्र तोडण्यात आलेली नाही. सदरची शाखा ही श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असून, येथे फारशी वर्दळ नसते. याचाच गैरफायदा घेऊन पतपेढी फोडण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.