कोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?, सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:22 PM2018-05-29T17:22:04+5:302018-05-29T17:22:04+5:30

विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक २५ जून २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीकरिता चाचपणी सुरू आहे. इच्छुकांची वाढती संख्या पाहता सेना, राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Who is the Konkan graduate lottery ?, a big list of interested in all posts | कोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?, सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी

कोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?, सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी

Next
ठळक मुद्देकोकण पदवीधरची लॉटरी कोणाला?सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी यादी

प्रकाश वराडकर

रत्नागिरी : विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक २५ जून २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीकरिता चाचपणी सुरू आहे. इच्छुकांची वाढती संख्या पाहता सेना, राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यालाच उमेदवारीसाठी प्राधान्य मिळाले आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातूनही उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी आग्रह धरला आहे. नेहमी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उमेदवारीबाबत डावलले जात असल्याने सर्वच पक्षांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मात्र, या जिल्ह्यांमधील पदवीधर मतदारांची नोंदणी कमी आहे. त्या तुलनेत ठाणे, रायगड, पालघर विभागातील मतदार नोंदणी अधिक असल्यानेच राजकीय पक्षही अधिक मतदार असलेल्या जिल्ह्यातच उमेदवारी देतात, असे आजवरचे चित्र आहे. त्यामध्ये यावेळी काही बदल होणार का, याकडे लक्ष आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी झाले होते. त्यांची मुदत येत्या ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मात्र, यावेळी निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

तरीही रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. ठाणे येथूनही भाजपकडे उमेदवारीची मागणी झाली आहे. मात्र, डावखरे यांची उमेदवारी अंतिम असल्याचे पक्षातील चित्र आहे.

राष्ट्रवादीमधून निरंजन डावखरे हे बाहेर पडल्याने या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मजीद मुल्ला (ठाणे), चेतन पाटील (नवी मुंबई), उमेश शेट्ये (रत्नागिरी) व अनिलकुमार जोशी आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे कोकण पदवीधरचे आमदार डावखरे भाजपध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडून डावखरेंना तोडीस तोड ठरेल, अशा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

शिवसेनेकडून या मतदारसंघात यावेळी संजीव मोरे (ठाणे), सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम (ठाणे) यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. सेना व भाजप उमेदवार आमने - सामने येणार असल्याने युतीच्या मतांची विभागणी होणार आहे.

निवडणूक अधिसूचना जारी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह ४ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना ३१ मे रोजी निवडणूक आयोगाकडून जारी होणार आहे. ७ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. ८ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ११ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. २५ जूनला मतदान व २८ जूनला मतमोजणी होणार आहे.

ठाणे, रायगडवर मदार

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात ९७ हजारांपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सर्वाधिक मतदार हे ठाणे व रायगड जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

सेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेही पदवीधर मतदार या दोन जिल्ह्यांमध्येच आहेत. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमधीलच उमेदवारांची निवड होणार असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. मात्र येणाऱ्या काळात यामध्ये बदल होणार का की या जिल्ह्यांमधीलच उमेदवार देण्यात येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बालेकिल्ला काबीज करणार ?

कोकण पदवीधर मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून या मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड होती. सातत्याने भाजपच्या आमदारांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली.

त्याचवेळी भाजपमध्येही अंतर्गत दुही होती. त्याचा फायदा घेत निरंजन डावखरे हे विजयी झाले होते. आता पुन्हा एकदा डावखरे भाजपमधून निवडणूक लढविणार असून, त्यांच्या विजयाच्या रुपाने पुन्हा या मतदारसंघावर पकड मिळविण्यासाठी भाजपने डावपेच आखले आहेत.

Web Title: Who is the Konkan graduate lottery ?, a big list of interested in all posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.