नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:24 PM2018-08-27T19:24:27+5:302018-08-27T19:25:50+5:30
हवा खेळती राहणे, नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर या मुद्द्यांचा विचार नव्या घरांमध्ये केलेला असतो. त्यामुळे नव्या घरांमध्ये ऊर्जेचा म्हणजे वीजेचा वापर कमी होऊ शकतो.
मुंबई- आजूबाजूला नव्या इमारती तयार होत असतात, तरिही काही लोक जुन्या घरांना विकत घेण्याचा निर्णय घेतात. घर घेताना ते नव्या इमारतीत घ्यावं की जुनंच म्हणजे रिसेल घर घ्यावं याचा नेहमीच गोंधळ होतो. घर घेणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न सतावत राहातो.
नवा बांधलेला फ्लॅट घ्यावा की कोणी वापरलेला फ्लॅट घ्यावा याचं उत्तर तुमच्या जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, आर्थिक स्थिती, तुमचे प्राधान्य कशाला आहे, आतील अंतर्गत सजावट, तुमचे बजेट, तुमची इच्छा अशा अनेक मुद्द्यांवर अवलंबून आहे. मात्र काहीवेळेस जुनं घर घेण्यालाही पसंती दिली जाते. ही घरे विकत घेतल्यावर त्यातील इंटिरियर म्हणजे अंतर्गत रचना व सजावट यांच्यावर खर्च होणार असला तरी तसे निर्णय घेतले जातात. म्हणजे शहरातील अमूक एका भागातील घरे किंवा कामापासून जवळच्या उपनगरातील घरे यांच्याबाबत जुन्या घरांची निवड केली जाते. किंवा एखाद्या परिसरामध्ये नवे बांधकाम झालेच नसेल तर तेथेही जुन्या घरांची निवड केली जाते. घर घेताना पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागतो. अर्थात घर नवं घ्यायचं की जुनं हा विचार त्या ग्राहकालाच करावा लागणार आहे.
1) घर घेण्यासाठीचा खर्च- घर घेताना ते आपल्या खिशाला परवडणं हा सर्वात मोठा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. म्हणजे नवं घर घेणं ज्यांना परवडत नाहीत ते जुन्या घराकडे वळू शकतात. पण त्यांना रजिस्ट्रेशन फी, ट्रान्सफर फी, स्टॅम्पची फी, युटीलिटी दर याचाही विचार करायला लागेल. तसेच रिसेल घराबाबतीत अंतर्गत दुरुस्ती आणि नवी सजावट यांचा विचार करुन खर्चाची तयारी ठेवावी लागते.
2) ऊर्जेचा वापर- ऊर्जेच्या वापराचा विचार केल्यास नवं बांधलेलं घर हा चांगला पर्याय होऊ शकतो. काही वर्षांपुर्वी बांधलेल्या घरांपेक्षा आज बांधल्या जाणाऱ्या घरांमध्ये ऊर्जा संवर्धन करण्यासाठी नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागते. तसेच नवे नियमही तयार करण्यात आले आहेत. हवा खेळती राहणे, नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर या मुद्द्यांचा विचार नव्या घरांमध्ये केलेला असतो. त्यामुळे नव्या घरांमध्ये ऊर्जेचा म्हणजे वीजेचा वापर कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादे घर बांधले जात असतानाच तुम्ही हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह करु शकता. जुन्या म्हणजे रिसेल घरांमध्ये हे शक्य नसते.
3) वायरिंग, फिटिंग- नव्या घरांमध्ये सुरक्षित फिटिंग आणि वायरिंग केले असल्य़ामुळे घर गेतल्यानंतर काही वर्षे तरी निश्चिंत राहाता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा खर्च तात्काळ करावा लागत नाही. नव्या घरामध्ये तुम्ही घर बांधले जात असतानाच बिल्डरला त्यामध्ये हवे ते बदल सुचवू शकता. मात्र जुन्या घरांमध्ये वायरिंग वगैरे सोयी वापरल्या असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीवर खर्च काराव लागू शकतो. तसेच घरामध्ये फार बदल करता येत नाहीत. अंतर्गत रचनेमध्ये फारतर फर्निचर बदलण्याची संधी मिळते अर्थात त्यासाठी खर्च करावा लागतोच.
4) वित्तसहाय्य- जुने घर घेताना वित्तसहाय्य मिळवणे थोडेसे अडथळे पार करत करावे लागते. विविध कागदपत्रांची पूर्तता, घराची नोंदणी, कागदपत्रांची तपासणी अत्यंत काटेकोरपणे करावी लागते व तीसुद्धा आपल्याला स्वतःचा वेळ देऊन करावी लागते. मात्र नव्या घराच्या बाबतीत ही सगळी काळजी बहुतांशवेळा बांधकाम व्यावसायिक घेतात.
5) रिसेल व्हॅल्यू- रिसेल व्हॅल्यू म्हणजे आपल्य़ा घराला भविष्यात किती किंमत येईल याचाही विचार ग्राहकाला करावा लागतो. पाच वर्षांच्या घराला येणारी किंमत आणि वीस वर्षांच्या घराला मिळणारी रिसेल व्हॅल्यू यांच्यामध्ये नक्कीच फरक असतो.