रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 06:27 PM2018-02-07T18:27:34+5:302018-02-07T18:54:14+5:30

एव्हाना कट्ट्याकट्ट्यावर व्हॅलेंटाईन वीकची जादू पसरली आहे. ग्रुप-ग्रुपमध्ये तिला कसं मनातलं सांगावं याच्या चर्चा चालु आहेत.

From Roses Day to Valentine's Day, Learn How Valentine's Week | रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week

रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week

Next
ठळक मुद्देमुळात पाश्चिमात्य देशाची संस्कृती असली तरीही आज भारतात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून सुरु होऊन हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपतो. या आठवड्यात वेगवेगळे ८ दिवस तरुणाई साजरी करते.आम्ही तुम्हाला या आठवड्याचं वेळापत्रक दिलंय. आजच कामाला लागा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगून टाका.

मुंबई : मुळात पाश्चिमात्य देशाची संस्कृती असली तरीही आज भारतात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. पुर्वी हे प्रमाण फक्त शहरी भागात (ते ही जास्तकरुन मेट्रो सिटीमध्ये) जास्त होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातही या दिवसांची क्रेझ दिसून येते. ७ फेब्रुवारीपासून सुरु होऊन हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपतो. या आठवड्यात वेगवेगळे ८ दिवस तरुणाई साजरी करते. त्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे अशा ७ दिवसांनंतर शेवटी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेला हा ‘प्रेमाचा आठवडा’ संपतो. यानिमित्ताने पाहूया या प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय असतं आणि त्यादिवशी काय केलं जातं.  

१) रोझ डे - ७ फेब्रुवारी

आज ७ फेब्रुवारी म्हणजेच रोझ डेपासून या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. जास्तकरुन तरुणाई आणि कॉलेज स्टुडंट्समध्ये यादिवसाची उत्सुकता असते. कॅम्पसमध्ये सतत जिच्यावर नजर असते तिला गुलाबाचं सुंदर फुल देऊन किमान मैत्री व्हावी असा प्रयत्न मुलं करताना दिसतात. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी प्रतिकं असतात. त्यामुळे या रोझ डेला आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देताना कोणत्या रंगाचं द्यावं, यावर जास्त विचार करा.

आणखी वाचा - ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

२) प्रपोज डे - ८ फेब्रुवारी

‘तु मला आवडतेस’, हे एवढंच सांगण्यासाठी अनेक मुलं या एका खास दिवसाची वाट पाहतात. त्यासाठी त्या मुलांचे मित्रही चांगली फिल्डींग लावून मित्राची ‘मदत’ करत असतात. चांगली तयारी करुन, कधी कधी पाठांतर केलेले डायलॉग्ज बोलून, चांगलं गिफ्ट घेऊन त्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलं जातं. तिने होकार द्यावा यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. तिचा निर्णय नंतर येतोच पण प्रपोज डेचं निमित्त साधून आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली, याचं समाधान प्रपोज करणाऱ्याच्या मनात असतं.

३) चॉकलेट डे - ९ फेब्रुवारी

चॉकलेट आवडत नाही अशा फार कमी व्यक्ती आपल्याला सापडतील. यादिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना चॉकलेट देतात. यातही वेगवेगळे प्रकार असतात. मग आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणतं चॉकलेट आवडतं, याची माहिती काढून ते खास चॉकलेट निव़डलं जातं. अनेक चॉकलेट कंपन्या तर यादिवसासाठी आणि व्हॅलेंटाईन डेसाठी चॉकलेटची खास एडिशन सुरु करतं.

४) टेडी डे - १० फेब्रुवारी

 यादिवशी एकमेकांना टेडीज् गिफ्ट केले जातात. मुलींना टेडी बिअर जास्त आवडतात, त्यामुळे मुलं मुलींना टेडी बिअर देतात. हल्ली हाताच्या मुठीएवढं मिळणारे टेडी बिअर किंमतीने जास्त महाग नसतात, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसिध्दा एकमेकींना ते टेडी बिअर देऊ करतात.

५) प्रॉमिस डे - ११ फेब्रुवारी

यादिवशी तरुणाई आपल्या व्हॅलेंटाईनला वेगवेगळी वचनं देते, प्रॉमिसेस करते. नात्यात असलेली जोडपी एकमेकांना कमिटमेंट्स देतात. मित्र-मैत्रिणी मैत्री न तोडण्याची, कधीच लांब न जाण्याचं वचन देतात आणि घेतात.

६) हग डे - १२ फेब्रुवारी

आलिंगन, बाहुपाश, मिठी असे सुंदर शब्द असताना इंग्रजीत त्याला प्रतिशब्द काय तर ‘हग’. हा विनोद सोशल मीडियावर तुमच्याही वाचनात आला असेल. तर या मिठीशी संबंधित हा दिवस. यादिवशी एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा देण्याचं प्रयोजन असतं. मात्र हल्ली प्रत्यक्ष भेटून ते शक्य नसलं तरी लोक मग तंत्रज्ञानाचा आणि समाजमाध्यमांचा वापर करतात. शुभेच्छा देणारे कोट्स आणि इमेजेस वापरुन हा दिवस साजरा केला जातो.

७) किस डे - १३ फेब्रुवारी

एकमेकांवरील प्रेमाचं, काळजीचं आणि प्रणयाचं प्रतिक म्हणजे चुंबन. कपाळावरील चुंबन काळजी दाखवतं, तर गालावरील चुंबन प्रेम. तर समोरच्याप्रति आपल्या असलेल्या भावना दाखवण्यासाठी याची मदत होते. मुळचा पश्चिमेकडच्या देशांतील संकल्पना असल्याने हा दिवस यात समाविष्ट आहे. मात्र आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर करुन एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

८) व्हॅलेंटाईन्स डे - १४ फेब्रुवारी

 प्रियकर-प्रेयसीचा दिवस अशी याची सरळ व्याख्या असली तरी काळानुरुप आणि स्थळानुरुप व्हॅलेंटाईन डे या दिवसाची संकल्पना बदलत आली आहे. संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणासाठी हा दिवस साजरा केला जातो. नात्यात असलेल्या जोडप्यांसाठी हा दिवस वर्षातला फार महत्त्वाचा दिवस असतो तर (नाईलाजाने) सिंगल असलेल्यांसाठी हा वर्षातला सर्वात वाईट दिवस असतो. आपल्या मर्जीने आणि स्वखुशीने सिंगल असलेल्यांसाठी हा वर्षातला सर्वात बिनकामाचा आणि वायफळ दिवस असतो. यादिवसानिमित्त जागतिक बाजारपेठेत करोडोंची उलाढाल होत असते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला यादिवशी गिफ्ट देणं हा इथला अलिखित नियम असतो. मग प्रेमात असलेली तरुण जोडपी यादिवशी एकमेकांना भेटतात, बाहेर जेवायला किंवा फिरायला जातात. अशाप्रकारे थोडं-फार फरकाने सगळीकडे हा दिवस असाच साजरा केला जातो.

तर तरुणांसाठी (मनाने आणि वयाने) हा आठवडा फार गंमतीचा आणि हवाहवासा असतो. कॉलेजमध्ये हा आठव़डा धम्माल साजरा केला जातो. याचदरम्यान कॉलेजमध्येही त्यांचे वेगवेगळे डेज आणि फेस्ट सुरु असल्याने सगळीकडे फक्त मज्जा मज्जा आणि मज्जा असते. आम्ही तुम्हाला या आठवड्याचं वेळापत्रक दिलंय. आजच कामाला लागा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगून टाका.

Web Title: From Roses Day to Valentine's Day, Learn How Valentine's Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.