Yamla Pagla Deewana Phir Se movie review: नुसताच वैताग!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:05 PM2018-08-31T14:05:05+5:302023-08-08T19:28:38+5:30
धर्मेन्द्र, सनी देओल, बॉबी देओल ही तिकडी पुन्हा एकदा ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा अॅक्शन-कॉमेडीपट घेऊन रूपेरी पडद्यावर परतली आहे.
- श्वेता पांडेय
धर्मेन्द्र, सनी देओल, बॉबी देओल ही तिकडी पुन्हा एकदा ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा अॅक्शन-कॉमेडीपट घेऊन रूपेरी पडद्यावर परतली आहे. देओल कुटुंबाच्या ‘यमला पगला दीवाना’ या फ्रेंचाईजीचा हा तिसरा भाग आहे. २०११ मध्ये ‘यमला पगला दीवाना’ आला होता. हा चित्रपट सुपरडुपर हिट होता. दोन वर्षांनी या फ्रेंचाईजीचा दुसरा भाग आला. पण बॉक्सआॅफिसवर तो दणकून आपटला. याऊपरही पाच वर्षांनंतर या फ्रेंचाईजीचा तिसरा भाग आणण्याचे धाडस देओल कुटुंबाने दाखवले. देओल तिकडीचा हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात...
चित्रपट सुरू होतो तो पंजाबातून. येथे वैद्य पूरणसिंह (सनी देओल) हा भाऊ काला (बॉबी देओल) आणि आपल्या दोन मुलांसह राहत असतो. पूरण सिंहच्या पूर्वजांनी वज्रकवच नावाचा एक आयुर्वेदीक फॉर्म्युला तयार केलेला असतो. बड्या बड्या औषध कंपन्यांचा यावर डोळा असतो. पण पूरणसिंह हा फॉर्म्युला कुणालाच देत नाही. अशात मारफतिया नामक औषध कंपनीचा मालक हा फॉर्म्युला मिळवण्यासाठी येतो आणि पूरणसिंहसोबत भिडतो. दुसरीकडे पूरणचा भाऊ कालाचे लग्न जुळत नसते. शिवाय त्याच्याकडे जयंत परमार नावाचा एक भाडेकरू नाममात्र भाड्यावर वर्षानुवर्षापासून राहत असतो. वकील असलेला जयंत व घरमालक पूरण यांच्या कोर्टकचे-या सुरू असतात. एकदिवस पूरणच्या घरी चीकू (कृति खरबंदा) नावाची मुलगी येते. तिला आयुर्वेदाचे ज्ञान मिळवायचा असते. पण याचदरम्यान कथेला एक वेगळी कलाटणी मिळते. पूरणसिंहवर फॉर्म्युला चोरीचा आरोप होतो आणि कथा पंजाबातून थेट गुजरातेत पोहोचते. पुढे काय होते, हे तुम्हाला चित्रपटगृहात जावूनचं बघावे लागेल.
या चित्रपटात एक कोर्टरूम सीन आहे. यात काही लोक धर्मेन्द्र यांना आता पुढे काय करायचे? असा प्रश्न करतात. यावर धर्मेन्द्र अतिउत्साहात ‘टाईमपास’ असे उत्तर देतात. विश्वास ठेवा, या चित्रपटात ‘टाईम’ हीच एक अशी गोष्ट आहे, जी ‘पास’ होत नाही. इतका उबग आणणारा, कंटाळवाणा विनोदी चित्रपट कदाचितचं तुम्ही बघितला असेल. चित्रपटाच्या पटकथेबद्दल सांगायचे तर ‘शोधाल तर सापडेल’ असे एकचं उत्तर मिळते. या चित्रपटात ना कॉमेडी आहे, ना अॅक्शन, ना ड्रामा, आहे ती केवळ प्रेक्षकांना वैताग आणणारी ‘ट्रॅजेडी’. म्हणायला चित्रपटात सनी देओल, धर्मेन्द्र, बॉबी देओल आहेत. पण तिघेही असूनही त्यांची उपस्थिती कुठलाही परिणाम साधत नाही. संवादफेकीपासून तर त्यांच्या देहबोलीपर्यंत सगळेच विचित्र वाटून जाते. कृति खरबंदा काही ठिकाणी सुंदर दिसतेय. पण शत्रुघ्न सिन्हा, असरानी यांना या चित्रपटात का घेण्यात आलेय, हे शेवटपर्यंत कळत नाही.
चित्रपटातील एकमेव लोकप्रीय गाणे ‘रफ्ता रफ्ता’ शेवटी दाखवले गेले आहे. यात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, रेखा यांचा कॅमिओ आहे. खरे तर चित्रपट टीव्हीवर पाहवा, याही लायकीचा नाही. पण तुम्ही देओल कुटुंबाचे चाहते असाल तर तो बघायचा की नाही, हा निर्णय शेवटी तुमचा.