सांगलीतील तुंगच्या जात पंचायतीचे १३ पंच न्यायालयात हजर, कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 07:43 PM2017-09-15T19:43:09+5:302017-09-15T19:43:25+5:30
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले.
सांगली, दि. 15 - आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले. चार दिवसापूर्वी त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडूरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासाहेब शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले, (सर्व रा. नंदीवाले वसाहत, तुंग) अशी न्यायालयात शरण आलेल्या नंदीवाले जात पंचायतीच्या पंचांची नावे आहेत.
पांडूरंग चौगुले यांनी दहा वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला होता. त्यामुळे नंदीवाले जात पंचायतीने चौगुले कुटूंबास समाजातून बहिष्कृत करुन त्यांना वाळीत टाकले होते. त्यांना समाजातील धार्मिक कार्यक्रम, लग्न तसेच कोणाचे निधन झाले तरी बोलाविले जात नव्हते. जात पंचायतीने या कुटूंबाचे जगणे मुश्किल करुन सोडले होते. कोणीही नातेवाईक व समाजातील व्यक्ती त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हते. गेली दहा वर्षे हे कुटूंब अपमानित होऊन जगत होते. जात पंचायतीच्या त्रासामुळे त्यांना गाव सोडण्याची वेळ आली होती.
जात पंचायतीच्या या अन्यायाविरुद्ध पाडूरंग चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मृलन समितीच्या समितीकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते राहूल थोरात, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले, अवधूत कांबळे, अजय भालकर, प्रा. अनंतरकुमार पोळ यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची भेट घेऊन चौगुले कुटूंबावर गेली दहा वर्षे झालेल्या अन्यायाची माहिती दिली. तसेच राज्य शासनाने नुकताच पारित केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत नंदीवाले जात पंचायतीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. अंनिसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तुंग गावाला भेट देऊन चौकशी केली. ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यानंतर जात पंचायतीच्या १३ पंचाविरुद्ध सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सर्व संशयित न्यायालयात हजर झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली.