ताकारी, म्हैसाळच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत
By admin | Published: January 3, 2016 12:51 AM2016-01-03T00:51:47+5:302016-01-03T00:56:42+5:30
ऊर्जामंत्र्यांचे आदेश : संजयकाका पाटील यांची माहिती
कवठेमहांकाळ : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांना राज्य सरकारने वीज बिलात ३३ टक्के सवलत देण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू करण्यात आता अडथळा येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
थकीत वीज बिलासाठी म्हैसाळ योजना गेले काही महिने बंद आहे. १८ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने या योजनेचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने राज्य सरकारने या थकबाकीवर टंचाईतून ३३ टक्के वीज बिलाची सवलत देण्याचे मान्य केले.
म्हैसाळ आणि ताकारी योजनेचे पाणी सुरू व्हावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. टंचाईच्या माध्यमातून वीज बिलात सवलत दिली तर आम्ही गावागावांत जाऊन उर्वरित रक्कम भरण्यासाठी प्रयत्न करू; पण तातडीने ३३ टक्क्यांची सवलत द्यावी, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांना दिले. बावनकुळे यांनी शनिवारी सायंकाळी टंचाईतून म्हैसाळ आणि ताकारीला ३३ टक्केसवलत दिल्याचे सांगितले, असेही खासदार पाटील म्हणाले.
म्हैसाळ, ताकारी योजनेची बिले तातडीने ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एम. जी. शिंदे यांनी कमी केली आहेत. म्हैसाळ योजनेसाठी चार कोटी रुपयांची सूट मिळाली आहे. ताकारी योजनेचे सहा कोटी ५३ लाख रुपये थकीत वीज बिल होते. त्यातून दोन कोटी रुपयांची सवलत मिळाली असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, म्हैसाळ योजना थकीत वीज बिलामुळे बंद असल्याने मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत या तालुक्यांतील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याने म्हैसाळ योजना सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याने या बाबी मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्या. त्यामुळेच राज्य सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे.
म्हैसाळ योजना शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडविणारी असल्याने शेतकऱ्यांच्या मनात याबाबत जागरुकता करण्याचे काम सुरू केले आहे. आपण स्वत: शेतकऱ्यांना पैसे भरण्याचे आवाहन करीत आहोत. गावागावांत पैसे गोळा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी आता स्वत:हून पैसे देण्याच्या मानसिक तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत वीज बिलाची काही रक्कम भरून म्हैसाळ योजना चालू करण्यात येईल, असे खासदार पाटील यांनी सांगितले.
ताकारी योजनासुद्धा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीच आहे. या योजनेचेही ३३ टक्केवीज बिल
माफ व्हावे, असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. ताकारीचेही ३३ टक्के वीज बिल माफ झाले आहे.
येत्या दोन दिवसांत टेंभू योजनेलाही ३३ टक्केवीज बिलात सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल. याबाबत वीज बिलाचा ताळमेळ करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून खासदार पाटील म्हणाले की, आता म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनांचे पाणी दुष्काळी भागाला दिलासा देईल.