जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:52 AM2017-12-11T00:52:20+5:302017-12-11T00:53:44+5:30
जत : जत नगरपालिकेच्या दुसºया सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत किरकोळ बाचाबाची आणि शाब्दिक चकमक वगळता रविवारी सर्वत्र शांततेत व चुरशीने सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले. मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज, सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.
प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सहा व सात, नऊ येथे लक्षवेधी लढती होत आहेत. त्यामुळे तेथे अतिशय चुरशीने मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन, चार, सहा, आठ येथे अपक्ष उमेदवार जादा आहेत. त्यामुळे येथील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे.
सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. सायंकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा गर्दी वाढली. इंदिरानगर, स्टील कॉलनी, विठ्ठलनगर, लक्ष्मी गार्डन परिसरातील मतदान केंद्रात दुपारपर्यंत गर्दी होती. पन्नास टक्के मतदान तोपर्यंत झाले होते. त्यानंतर तेथे गर्दी झाली नाही. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ११.७२ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत ३०.९०, दुपारी दीड वाजेपर्यंत ४८.८०, साडेतीन वाजेपर्यंत ६३.३४ व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकत्रित ७५.५५ टक्के मतदान झाले.
मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा शहरातून संचलन केले. याशिवाय लक्षवेधी लढती होत असलेल्या ठिकाणी जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आमदार विलासराव जगताप यांनी प्रभाग क्रमांक १० येथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी प्रभाग क्रमांक ७ येथे व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी सहकुटुंब प्रभाग दोनमध्ये, तर माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी प्रभाग ७ येथे मतदान केले.