सांगली जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करणार: सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:04 AM2018-01-02T00:04:18+5:302018-01-02T00:05:38+5:30
सांगली : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढत असताना, गुणवत्तेच्या जोरावर जिल्हा परिषद शाळा पटसंख्या वाढवत आहेत. पालकांचा शाळांवर वाढत चाललेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक असून, या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आमदार, खासदारांच्या शिफारशींची गरज भासली पाहिजे. यापुढे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी येथे केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देशमुख म्हणाले की, विद्यार्थी हा सर्वाधिक काळ शिक्षकांच्या आणि शाळेच्या सान्निध्यात असल्याने त्याच्या प्रगतीसाठी पालकांएवढीच शिक्षकांचीही जबाबदारी असते. दानशूर व्यक्ती व शिक्षकांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळांचे रूपडे बदलत आहे. शिक्षकांनी केवळ पुस्तकातील धडे न शिकवता त्याला आयुष्यात उभे राहण्यासाठी काय गरजेचे आहे, याचे ज्ञान शिकवले पाहिजे.यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती तम्मणगौडा रवी, अरुण राजमाने, ब्रह्मानंद पडळकर, सुषमा नायकवडी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचा क्लास
छातीवर हात ठेवून सांगा, तुमच्यापैकी कितीजणांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात, असा प्रश्न पालकमंत्री देशमुख यांनी उपस्थित शिक्षकांना केला. यावर सर्वांनीच होकार दिला. त्यानंतर मूर्तीकार मूर्ती कशापासून तयार करतात, असा प्रश्न उपस्थितांना केला. यावर सर्वांनी दगडापासून असे उत्तर दिले. म्हणजेच पालक तुमच्या हातात दगडरूपी विद्यार्थी देतात व त्यातून तुम्ही विद्यार्थी घडवता, असे सांगत त्यांनी उपस्थित शिक्षकांना वारंवार प्रश्न विचारत ‘क्लास’ घेतला.
विलासराव जगताप यांच्या कानपिचक्या
शिक्षकांना शिकवायची मानसिकता उरली नाही. काही शिक्षक पगारासाठी काम करतात. पुरस्कार मिळविण्यासाठी जे शिक्षक खासदार, आमदारांच्या शिफारसी जोडतात, ते काय आदर्श काम करणार? पगाराच्या मानाने आपण काम करतो का, याचे मूल्यमापन प्रत्येक शिक्षकाने करावे, असे म्हणत आ. विलासराव जगताप यांनी उपस्थितांना चांगलाच डोस दिला.
सांगलीत सोमवारी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार व वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रा. सुषमा नायकवडी, भगवानराव साळुंखे, सुरेश खाडे, संजयकाका पाटील, संग्रामसिंह देशमुख, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, तम्मणगौडा रवी, सुहास बाबर, नीशादेवी वाघमोडे, अभिजित राऊत उपस्थित होते.