पोलिस पाटील भरतीला ‘अर्थ’पूर्ण तडजोडीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:40 PM2017-12-17T23:40:24+5:302017-12-17T23:40:24+5:30
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली असतानाच यातील ‘अर्थ’पूर्ण घडामोडींची चर्चा दोन्ही तालुक्यात रंगली आहे. कापूसखेडपाठोपाठ आता शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी, तडवळे येथील महिलांनीही भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे चित्र आहे. शेतकरी चळवळतील नेत्याच्या काही बगलबच्च्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
‘वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरती संशयाच्या भोवºयात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच या भरतीसाठी ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. कापूसखेड (ता. वाळवा) येथील नामदेव महादेव माने यांनी पोलिस पाटील भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपूनही कापूसखेड येथील उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्याचा आरोप केला आहे. यासाठी संबंधित उमेदवाराने शेतकरी चळवळीतील एका नेत्याची शिफारस घेऊन हे पदही पदरात पाडून घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. न्याय मिळाला नाही, तर बुधवार, दि. २० रोजी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माने यांनी दिला आहे.
माने यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अन्याय झालेल्या इतरांनीही थेट ‘लोकमत’शी संपर्क साधला आहे. शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी येथील सौ. उषा बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की, पाडळीवाडी येथील पोलिस पाटील पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. मी या पदासाठी सर्व निकषात बसत होते. यासाठी मी रितसर अर्ज करुन परीक्षाही दिली होती. तसेच तोंडी परीक्षाही चांगली गेली होती. असे असतानाही राजकीय दबावाला बळी पडून प्रांताधिकाºयांनी पात्र नसलेल्या उमेदवाराला पोलिस पाटील पदाची नेमणूक दिली आहे. या प्रक्रियेत गैरकारभार झाला असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याच्या प्रती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, विभागीय आयुक्त पुणे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना देण्यात आल्या आहेत.
तडवळे (ता. शिराळा) येथील श्रीमती अनुराधा आकाराम पाटील यांनीही या भरती प्रक्रियेत आपल्यावर अन्याय झाल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे शिक्षण एम. ए. पर्यंत झाले आहे. पोलिस पाटील पदासाठी अर्ज केला होता. लेखी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. मुलाखतीसाठी बोलावणे आले होते. मुलाखतसुद्धा चांगली झाली. परंतु ज्यांचे शिक्षण जेम-तेम आहे, लिहिता- वाचता येत नाही, अशा वैशाली सुभाष पाटील यांची चुकीच्या पध्दतीने निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोठा गैरकारभार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रक्रियेची चौकशी होऊन निवड झालेल्या वैशाली पाटील यांचे पद रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
या प्रक्रियेतील गैरकारभाराची व्याप्ती वाढू लागली असून, शेतकरी चळवळीतील नेत्यासह त्याच्या बगलबच्च्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली गतिमान केल्याचेही समजते. तक्रारींची संख्या वाढत असल्याने याबाबतची दखल प्रशासनाला घेणे भाग पडत असल्याचे चित्र आहे.
मोबाईल कॉल : नोंदी तपासा..!
या भरती प्रक्रियेत अन्याय झालेल्या पाडळीवाडी येथील उषा बाबासाहेब पाटील यांनी भरती प्रक्रिया कालावधीतील निवड झालेले उमेदवार, शासकीय अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवरील कॉल नोंदी तपासाव्यात. म्हणजे खरे काय ते स्पष्ट होईल, अशीही मागणी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.
पोलिस पाटील भरतीसाठी आपण प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे काहींची शिफारस केली. परंतु जाधव यांनी ही भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसारच केली जाणार असल्याचे सांगितले. एका शेतकरी चळवळतीतील नेत्याच्या बगलबच्च्यांनी यामध्ये अर्थपूर्ण हस्तक्षेप केल्याचे ‘लोकमत’मुळे स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही.
- राजू शेट्टी, खासदार.
वाळवा-शिराळ्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींचा विचार करुन संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जयंत पाटील, आमदार.