दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तासगावमधून दोघे ताब्यात ‘एटीएस’चे छापे : सांगली जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:25 PM2018-08-23T21:25:48+5:302018-08-23T21:30:03+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पथकाने या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. याच कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडला होता. याचा तपास करीत असतानाच दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरे याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले होते. शस्त्रसाठ्याप्रकरणी काही संशयित अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही जणांची नावे पुढे येत आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी एटीएसचे राज्यभर छापासत्र सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी पथकाने कोल्हापुरात छापे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी हे पथक सांगलीत दाखल झाले. पथकाने तासगाव शहरासह तालुक्यातही छापा टाकला. या छाप्यात दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांची मदत न घेता पथकाने ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे व कारवाईचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. ताब्यात घेतलेले दोघेही एका संस्थेशी संबंधित जुने आणि कट्टर कार्यकर्ते असल्याचे समजते.
दरम्यान, दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना तासगावमधून ताब्यात घेतल्यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही नेत्यांना यापूर्वीच संरक्षण दिले आहे, पण ते त्यांनी नाकारले होते. पण गुरुवारी स्वत: पोलिसांनी काही नेत्यांची भेट घेऊन, पोलिसांना सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अशी सक्त सूचना केली आहे.
हालचालींवर नजर
एका वादग्रस्त संस्थेचे तासगावसह तालुक्यात किती कार्यकर्ते आहेत, याची तासगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांची यादीही बनविण्यात आली आहे. यामध्ये बारा कार्यकर्त्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे. ही यादी एटीएसकडे सोपविण्यात येणार आहे.