विट्यात अनिल म. बाबर यांचा अर्ज अवैध
By admin | Published: November 2, 2016 11:45 PM2016-11-02T23:45:39+5:302016-11-02T23:45:39+5:30
विकास आघाडीला धक्का : छाननीत ९९ अर्ज बाद, नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत
विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीतील सत्ताधारी कॉँग्रेस व विकास आघाडीच्या युतीचे प्रमुख उमेदवार अनिल मनोहर बाबर यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध झाला. नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी दाखल केलेल्या सात अर्जांपैकी कॉँग्रेसच्या सौ. जयश्रीताई सदाशिवराव पाटील व शिवसेनेच्या सविता तानाजी जाधव यांचे अर्जही एबी फॉर्म नसल्याने अवैध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केले.
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते. तर नगरसेवक पदासाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी सकाळी पालिका सभागृहात अर्जांची छाननी झाली. त्यावेळी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप, रासप, विकास आघाडी यासह अपक्ष उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी प्रभागनिहाय अर्जांची छाननी केली. यावेळी कॉँग्रेसचे वैभव पाटील, किरण तारळेकर, शिवसेनेचे अमोल बाबर, भाजपचे दिलीप आमणे, अॅड. विनोद गोसावी, रासपचे शिवाजीराव हारूगडे आदी प्रमुख उपस्थित होते. या छाननीवेळी सारिका सपकाळ, मीनाक्षी पाटील, नेहा डोंबे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली.
पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाच्या अर्जांची छाननी झाली. कॉँग्रेसमधून सौ. जयश्रीताई पाटील व त्यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, प्रतिभा पाटील यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आल्याने सौ. जयश्री पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शिवसेनेतून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा सौ. शीतल अमोल बाबर व सविता तानाजी जाधव यांचे अर्ज होते. यावेळी सविता जाधव यांच्या अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला, तर रासपमधून पूजा तारळेकर यांचा अर्ज वैध ठरला आहे.
विटा नगरपरिषदेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी १९० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्र. २ ब मधून विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व उपनगराध्यक्ष अॅड. सचिन जाधव यांनी कॉँग्रेसच्या प्रमुख उमेदवारासाठी पर्यायी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने या दोघांचेही अर्ज अवैध झाले, तर प्रभाग क्र. ९ ब मधील कॉँग्रेसचे प्रमुख उमेदवार अॅड. अजित गायकवाड यांना पर्यायी अर्ज दाखल केलेले अशोकराव गायकवाड यांच्या अर्जाला एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्जही अवैध झाला.
कॉँग्रेस व विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार विद्यमान नगरसेवक अनिल मनोहर बाबर यांनी विकास आघाडीतून एकच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या अर्जावर बाबर यांची सही नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. हा निर्णय कॉँग्रेस व विकास आघाडीला धक्कादायक समजला जातो. परंतु, या निर्णयाविरुध्द अनिल म. बाबर यांनी न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. छाननीत नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवारांचे सातपैकी चार, तर नगरसेवक पदाचे एकूण ९९ अर्ज अवैध झाले आहेत. (वार्ताहर)
अमोल बाबर विरुद्ध नंदू पाटील
शिवसेनेचे प्रमुख उमेदवार अमोल अनिल बाबर यांचा प्रभाग २ ब मधील अर्ज वैध झाल्याने त्याठिकाणी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील विरुध्द शिवसेनेचे अमोल बाबर असा सामना रंगणार आहे. ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.