भाजप-काँग्रेसची विचारधारा एकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:12 AM2017-08-18T00:12:29+5:302017-08-18T00:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य अधिवेशन येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेश्राम बोलत होते. अधिवेशनास मालेगावचे मौलाना अब्दुल हमीद अझहरी, राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी प्रा. विलास खरात, बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. नामदेव करगणे उपस्थित होते.
मेश्राम म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर विशिष्ठ समाजालाच संसदेवर जादा प्रतिनिधीत्व दिले. नोकरशाही, न्यायालये व प्रसारमाध्यमांवर याच मंडळींचे वर्चस्व आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ त्यांच्याच वर्चस्वाखाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात ६५ हजार दंगली झाल्या. त्यात लाखो मुस्लिम मारले गेले. त्यामागे धार्मिक शक्तींचाच हात असल्याचे तत्कालिन सरकार सांगत होते. पण त्या शक्तींवर कारवाई करीत नव्हते. यामागे मुसलमानांना असुरक्षित ठेवून मतांची पोळी भाजण्याचाच डाव होता. भाजपची सत्ता आता आली आहे. मुसलमानांसाठी काँग्रेस हा छुपा, तर भाजप हा उघड शत्रू आहे. दोघांची विचारधाराही एकच आहे. दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्यावर तीन हजार वर्षांपासून अन्याय केला जात आहे.
आता मुस्लिम
समाजावर अन्याय सुरू झाला आहे. बहुजन व गोरगरीब, दु:खी जनतेच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी मुस्लिम समाजाने सहकार्य करावे. मौलाना अझहरी म्हणाले की, मुस्लिम हे याच देशात जन्मले आहेत. जे मुस्लिमांना बाहेरच्या देशात जा, असे म्हणतात, त्यांचा डीएनए काय आहे, हे तपासावे. तीन तलाकच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे अश्रू ढाळत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये काय केले? तिहेरी तलाख हा मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे. कायद्याने तो रद्द होऊ शकत नाही. गोरक्षेच्या नावाखाली खोटे आरोप केले जात आहेत.
हीच परिस्थिती कायम राहिली, तर देशातील जनतेत असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल.
हिंंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावून लोकांना आगीत ढकलले जात आहे. देश वाचविण्यासाठी सर्व
समाजांनी एकत्र आले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज न
करणारा भारत काहींना तयार करायचा आहे.
यावेळी आॅल इंडिया एकता फोरमचे मुफ्ती फारूख, मौलाना फैयाजुल सिद्दिकी हाजी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, मौलाना अब्दुल
रऊफ, मुफ्ती सालीम कासमी,
रफीक मुजावर, मुफ्ती मुजम्मील, असिफ बावा, आदी उपस्थित
होते.
५२ टक्के मतांसाठी!
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजाची लोकसंख्या पाव टक्का आहे. तरीही भाजपने त्यांना पंतप्रधान केले. यामागे देशातील ५२ टक्के ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी राहावा, अशीच खेळी होती. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघच देश चालवत असून, केवळ दिखाव्यासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवला आहे, अशी टीकाही वामन मेश्राम यांनी केली.