सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख विराजमान
By Admin | Published: March 21, 2017 03:42 PM2017-03-21T15:42:20+5:302017-03-21T15:42:20+5:30
उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांची निवड
आॅनलाईन लोकमत
सांगली : अखेर सांगली जिल्हा परिषदेतही भाजपने मंगळवारी सत्ता हस्तगत केली. शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांच्या मदतीने भाजपने सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा मार्ग मोकळा केला. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल संग्रामसिंह देशमुख यांना ३५ आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या सुहास बाबर यांना ३५ मते मिळाली. विरोधी काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना २५ आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील यांना २५ मते मिळाली. आज दुपारी तीन वाजता ही निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर जल्लोष करण्यात आला.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ३५ संख्याबळ असल्याचा दावा केला होता, तो खरा ठरला. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांना या निवडणुकीत अपेक्षित संख्याबळ गाठता आले नाही. मंगळवारी सकाळपासूनच सांगलीत वेगवान राजकीय हालचाली झाल्या. महाबळेश्वर येथे सहलीवर गेलेले भाजपचे २0 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. तेथून त्यांनी थेट अध्यक्ष निवडीपूर्वी सांगलीत गाठली.
दरम्यान, आमदार पतंगराव कदम यांच्या सांगलीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील आदी उपस्थित होते.
भाजपने सकाळीच पोलिस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी करावयाच्या तडजोडींचे अधिकार संजयकाकांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संजयकाकांनी शिवसेना, घोरपडे गटाशीही चर्चा केली. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला पदांचीही आॅफर दिली होती. भाजपला या गोष्टीची कल्पना आल्यानंतर त्यांनीही बाबर यांना चर्चेला बोलाविले. (प्रतिनिधी)