सांगलीत चिंब उत्साहात रंगपंचमी साजरी
By admin | Published: March 17, 2017 11:32 PM2017-03-17T23:32:36+5:302017-03-17T23:32:36+5:30
रंगांची मनसोक्त उधळण : कोरड्या रंगपंचमीला प्राधान्य, तरुणाईचा जल्लोष; रस्ते रंगाने माखून गेले
सांगली : उन्हाचा चढत चाललेला पारा आणि त्यासोबतीला रंगांची उधळण करत शुक्रवारी शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाविद्यालय परिसरात तसेच प्रत्येक तरुण-तरुणींचा मोठा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात बहुतांश ठिकाणी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
होळीनंतर आठवडाभरातच आलेल्या रंगपंचमीला रंगांची उधळण करण्याची संधी शहरवासीयांना मिळाली. आपल्याकडे होळीला रंग खेळला जात नसल्याने सर्वांना रंगपंचमीची प्रतीक्षा होती. सकाळपासूनच शहरात रंगपंचमीला सुरुवात झाली. यंदा रंगांच्या उधळणीबरोबर पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यात आला असला तरी, कोरड्या रंगांची अक्षरश: पोती घेऊन तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होते. परिचिताला गाठून त्याला रंग लावण्यात येत होता. रंगांच्या उधळणीबरोबरच शहरातून मोटारसायकलवरून रपेट मारत अनेकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र, पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केल्याने मर्यादित स्वरुपात तरुणांनी हुल्लडबाजी केली.
शहरात रंगपंचमीचा खरा उत्साह महाविद्यालय परिसरात दिसून आला. शहरातील सर्वच महाविद्यालयांचे रस्ते अक्षरश: रंगाने माखून गेले होते. रंगांची उधळण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. युवतींचे अनेक गटही वाहनांवरून रंगांची उधळण करीत फिरताना दिसत होते. दुपारनंतर रस्ते ओस पडले असले तरी, सायंकाळी पुन्हा रंगांच्या उधळणीला जोर आला होता.
सकाळपासून लहान मुले रंगाची उधळण करीत होते. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट होता. तरीही तरुण दुचाकीवरुन रंगाची उधळण करताना दिसत होते. शहरातील अनेक दुकाने बंद होती. सायंकाळनंतर ती सुरु झाली. पण पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. (प्रतिनिधी)