मला आव्हान देऊन सगळे दमले! : जयंत पाटील, वाळव्यातील विरोधकांच्या एकीवरून भाजपला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:53 PM2017-11-27T23:53:02+5:302017-11-27T23:54:06+5:30
सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल
सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल केला. हुतात्मा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाबद्दल अभिनंदन करताना हुतात्मा कारखाना व माझे नाते मुख्यमंत्र्यांना माहीत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
आ. पाटील महापालिका क्षेत्रातील विविध कार्यक्रमांसाठी सांगलीत सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोनच दिवसांपूर्वी वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद््घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाळव्यात आले होते. त्यांनी पाटील यांच्या विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, मला आव्हान देऊन सगळे दमले आहेत, त्यावर अधिक चर्चा नको, असे म्हणत विरोधकांच्या मोर्चेबांधणीला बेदखल केले.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ठाकरे सत्तेत राहून भाजपवर टीका करीत आहेत, तर त्यांचे मंत्री भाजप सरकारच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देतात. त्यांना धड सत्तेतही राहता येत नाही आणि विरोधी पक्षातही! पाठिंबा काढला तर, त्यांच्या जागी राष्ट्रवादी जाऊन बसेल, याची त्यांना चिंता आहे. जनतेचे हित जोपासण्यापेक्षा ते वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत. वसंतदादा पाटील यांनीच राज्याची सूत्रे शरद पवार यांच्या हाती दिली होती. त्यानंतर दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांच्यासह सर्व नेते पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. इतिहासातील आठवणी काढून लोकांत मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करीत आहेत. त्यांनी शिवसेना भाजपसोबत आहे की नाही, हे आधी ठरवावे. महागाईने भरडली जात असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत; पण शिवसेनेला मात्र दिशाच सापडत नाही. सर्वात दिशाहीन पक्ष शिवसेना आहे.
चांगल्या कामाला कधीच विरोध नाही : पाटील
हुतात्मा साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प रद्द केल्यावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली होती. त्यावर आ. जयंत पाटील म्हणाले की, हुतात्मा कारखान्याने इथेनॉलचा प्रस्ताव कधी दिला, तो कधी रद्द झाला आणि पुन्हा त्याला कधी मान्यता मिळाली, हे मला माहीत नाही. चांगल्या कामाला मी कधीच विरोध करीत नाही. मुख्यमंत्री कोणाबद्दल बोलले हे कळत नाही; पण माझ्याबद्दल नक्कीच ते बोलले नाहीत. कारण मी असे कोणतेही कृत्य केलेले नाही. शेतकºयांना चार पैसे देणाºया प्रकल्पाचे मी स्वागत करतो. ‘हुतात्मा’ व माझे नाते त्यांना माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला.