‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून ग्रामीण भागात फसवणूक : बेकायदेशीर उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:41 PM2018-06-18T23:41:30+5:302018-06-18T23:41:30+5:30
संख : दरीबडची (ता. जत) येथे २०१६ मध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले होते. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ असे आमिष दाखवून तीन हजार तिकिटे खपविण्यात आली होती. ग्राहकांना बंपर बक्षिसे तर दिलीच नाहीत. तसेच सोडतीनंतर फॅन, फिल्टर, इस्त्री, मिक्सर, रोटीमेकर, थर्मास, कुकर, इन्व्हर्टर यासारखी मोठ्या संख्येने असलेली बक्षिसे बनावट, निकृष्ट दर्जाची देऊन ग्राहकांची बोळवण केली आहे.
बोगस लकी ड्रॉमध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याकडे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी लक्ष देऊन बोगस लकी ड्रॉची चौकशी करून कार्यवाही करावी व ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.
पूर्व भागातील दरीबडची येथे मे २०१६ मध्ये साईबाबा सेवाभावी संस्थेतर्फे लकी ड्रॉ काढण्यात आला होता. बक्षिसे म्हणून महागड्या वाहनांची छायाचित्रे छापून तिकिटे खपवली होती. पहिले बक्षीस महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी ठेवण्यात आली होती. बुलेट, हिरो होंडा, बजाज गाड्या, टीव्ही, फ्रीज ही पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ ‘एक कूपन, एक वस्तू’ अशा योजनांचे आमिष ग्राहकांना दाखविण्यात आले होते. तिकिटाची रक्कम प्रथम १ हजार रूपये व बक्षिसे नेतेवेळी ५०० रूपये अशी ठेवण्यात आली होती. यामधून कोट्यवधीची रक्कम गोळा झाली होती.
लकी ड्रॉ जून २०१६ मध्ये काढण्यात आला. बंपर बक्षिसे भिवर्गी, खंडनाळ, संख, दरीबडची येथील ग्राहकांना लागली होती. सोडतीनंतर बंपर बक्षिसे दिलीच नाहीत. तसेच मोठ्या संख्येने असलेली बक्षिसे हैदराबाद येथे दुय्यम वर्गाची, बनावट खरेदी करून ती देण्यात आली. यातून ग्राहकांची फसवणूक, लुबाडणूक करण्यात आली आहे.+
गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं!
पूर्व भागातील दरीबडची हे शांत व सुसंस्कृत गाव आहे. पण बोगस लॉटरीवाल्यांमुळे गाव चांगले असतानासुध्दा गावाची नाहक बदनामी झाली आहे, फसवणूक झाली आहे. गाव तसं चांगलं, पण लॉटरीवाल्यांनी वेशीला टांगलं, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दरीकोणूर येथे मारहाण
दरीकोणूर येथील चालकाला बोगस लकी ड्रॉची सोडत काढताना पकडून बेदम चोप दिला होता. त्याची चारचाकी मोटार ओढ्यात ढकलून दिली होती. त्याचे अपहरण करून घरातून पैसे नेले होते. ग्राहकांना पैसे देऊन प्रकरण परस्पर मिटविण्यात आले होते.
दुष्काळी निधीसाठी मदत
लकी ड्रॉ तिकिटे खपविण्यासाठी व ग्राहकांचा विश्वास बसावा यासाठी, बक्षिसांचे वितरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते केले जाणार आहे. लकी ड्रॉच्या फायद्यातील रक्कम दुष्काळी निधीसाठी देण्यात येणार आहे, अशी जाहिरात ध्वनिक्षेपक लावून करण्यात आली. पण प्रत्यक्षात कोणताच कार्यक्रम झाला नाही, दौराही नव्हता.