कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा सीआयडीची फिर्याद : अनिकेत कोथळे, अमोल भंडारे यांच्या पलायनाचा बनाव अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:24 AM2018-02-07T01:24:59+5:302018-02-07T01:25:06+5:30
सांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी
सांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी अटकेतील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सीआयडीने फिर्याद दाखल केली आहे.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली. पोलिस कोठडीत अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला. यानंतर अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला. याप्रकरणी मुख्य संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली.
अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेने अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला. अनिकेतचा मृतदेह पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. अमोल भंडारे कोणाला दिसू नये, यासाठी त्याला बाहेरील दोन लोकांच्या ताब्यात दिले. हे दोन लोक भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर बसले होते. ही बाब तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे खोटी फिर्याद दाखल करुन वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल केल्याप्रकरणी कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
एकूण आठ गुन्हे दाखल
कामटेविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, संगनमत, कट रचणे, बळजबरीने एखादी गोष्ट कबूल करण्यासाठी बेदम मारहाण करणे, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी, सर्वांचा सामाईक उद्देश व अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद, असे नऊ गुन्हे दाखल केले आहेत.