सांगलीत साकारली मोडी लिपितील शुभेच्छापत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 04:21 PM2017-10-10T16:21:30+5:302017-10-10T16:27:19+5:30
सांगलीतील मोडी लिपिचा अभ्यास करणाºया महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी यंदा चक्क मोडी लिपितील सुंदर शुभेच्छापत्रे साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सांगली, 10 : हिंदी, मराठी आणि इंग्रजीतील शुभेच्छापत्रांसारखीच सुंदर मोडी लिपिचेही शुभेच्छापत्र पहायला मिळेल, हे कोणाच्या गावीही नसेल, मात्र सांगलीतील मोडी लिपिचा अभ्यास करणाºया महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी यंदा चक्क मोडी लिपितील सुंदर शुभेच्छापत्रे साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशाप्रकारचा हा महाराष्टÑातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.
मोडी लिपिचा प्रसार आणि प्रचार व्हावा या दृष्टीकोनातून ही शुभेच्छापत्रे साकारली आहेत. गेल्या चार वर्षांपासून सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात मोडी प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. मान्यताप्राप्त या अभ्यासक्रमात दरवर्षी मुलींचा मोठा सहभाग असतो.
यंदाच्या वर्षात मोडीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थीनींनी दिवाळीची शुभेच्छापत्रे मोडी लिपित साकारण्याचा संकल्प केला आणि पाहता पाहता अनेक सुंदर व थक्क करणारी शुभेच्छापत्रेही साकारली.
येथील प्राचार्य आर. जी. कुलकर्णी आणि प्रा. उर्मिला क्षीरसागर यांनी या मुलींना प्रोत्साहन व सहकार्य केले आणि मोडी लिपितील शुभेच्छापत्रांचा राज्यातील पहिलाच उपक्रम पार पडला.
मोडी लिपीचे जतन व संवर्धन करण्यासाठीची एक चळवळ सांगलीत उभी राहिली आहे. या चळवळीला आता शैक्षणिक स्तरावर बळही मिळाले आहे. मोडीचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाºया मुलींना जुनी मोडी लिपितील कागदपत्रांचे वाचन व भाषांतर करण्यासाठी पैसेही मिळतात. म्हणजेच रोजगाराची मोठी संधीही यातून मिळाली आहे.
अजूनही मोडी लिपीच्या जाणकार लोकांची मोठी गरज जिल्ह्यात आणि राज्यातसुद्धा आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाला रोजगाराच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे.