काँग्रेस-राष्ट्रवादी युती होईल : पतंगराव कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:18 PM2017-10-30T15:18:44+5:302017-10-30T15:22:26+5:30
केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कडेगाव : केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार डॉ. पतंगराव कदम म्हणाले, काँग्रेस हा तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे. अनेक जय-पराजय काँग्रेस पक्षाने पचवले आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र आता हवा बदलली आहे. या सरकारचा कारभार जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे पूर्वीचे दिवसच चांगले होते, अशी लोकांची भावना झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली आहे. कडेगाव पलूस तालुक्यातही काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना जादा अधिकार दिले आहेत.
विकास कामांसाठी आता थेट ग्रामपंचायतीकडे निधी येत आहे. त्यामुळे सरपंचांना प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे. नवीन सरपंचांना कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यशाळा घेणार आहे.
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, पण कार्यवाहीस विलंब होत आहे. कर्जमाफीला जाचक निकष लावल्याने कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, असेही कदम यांनी सांगितले. आता जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होत आहेत. या गळीत हंगामातही सोनहिरा कारखाना ऊस दरात अग्रेसर राहील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना करा
कडेगाव शहरात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. याची दखल घेऊन शहरात तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे तसेच नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना दिल्या.
...आता कारभाराकडे लक्ष
नूतन सरपंच आणि सदस्यांनी पारदर्शक, सक्षम व प्रभावीपणे कारभार करावा. अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. गावोगावी प्रचंड विकास कामे झाली आहेत. तरीही राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहे, असेही कदम म्हणाले.