सोलापूरच्या ठेकेदाराची रोकड, मोटार, रिव्हॉल्व्हर पळवले
By admin | Published: October 2, 2016 01:09 AM2016-10-02T01:09:56+5:302016-10-02T01:09:56+5:30
पेठ येथील घटना : वाघवाडीतील गोदामात कोंडून मारहाण
इस्लामपूर : सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदाराला शहरातील वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोलपंपाच्या भांडार खोलीत कोंडून त्याच्याकडील एक लाख रुपयांची रोकड, मोबाईल, कार आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर, १२ जिवंत काडतुसे काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
हा प्रकार २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी ठेकेदाराने पेठ (ता. वाळवा) येथील १७ जणांविरुद्ध खंडणी व मारहाणीची फिर्याद सोलापूर पोलिसात दिली. सोलापूर पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी किशोर बारडोले पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणारे ठेकेदार आहेत. घटनेतील मुख्य संशयित अर्जुन पाटील व बारडोले यांच्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्याबाबत लेखी करार झाला होता. बारडोले यांनी बांधकाम करुनही त्यांना त्याचे पैसे न देता संशयितांनी त्यांना प्रतीक पेट्रोलपंपाच्या भांडार खोलीत कोंडून घालून टाक्यांचे बांधकाम का करत नाहीस? असे म्हणून बेदम मारहाण केली.
कमरेच्या बेल्टने गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच बारडोले यांच्याकडील परवान्याचे रिव्हॉल्व्हर, १२ जिवंत काडतुसे, मोबाईल, कार, कराराची कागदपत्रे व एक लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर नोटरी करुन घेऊन बारडोले यांना सोडून दिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर करीत आहेत. (वार्ताहर)
मारहाण, खंडणी, लुटीचा गुन्हा
याबाबत बांधकाम ठेकेदार किशोर मच्छिंद्र बारडोले (वय ४८, रा. वाणी गल्ली, बार्शी रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन सखाराम पाटील, अतुल पाटील, अशोक पाटील, लहु गुरव, लिपिक गायकवाड (सर्व रा. पेठ, ता. वाळवा) यांच्यासह इतर ८ ते १२ साथीदारांविरुद्ध बेकायदेशीरपणे कोंडून ठेवून मारहाण करणे, खंडणी व लुबाडणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.