पेठ-सांगली रस्त्याची दुरवस्था पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर पेटला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:32 AM2017-10-24T11:32:00+5:302017-10-24T11:44:42+5:30
पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.
सांगली ,दि. २४ : पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या खराब रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.
पेठ-सांगली रस्त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. याच मार्गावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवे लावून खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या आंदोलनाला पाचच दिवस झाले नाहीत, तोपर्यंत रविवारी मध्यरात्री या रस्त्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात पाच वाहनांचा अपघात झाला.
या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी, एक मोठा अपघात टळला. त्यामुळे या अपघाताचा संदर्भ देत सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य सतीश साखळकर यांनी सोशल मीडियावर याप्रश्नी आवाज उठविला.
हा रस्ता जीवघेणा ठरत असतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना या रस्त्याच्या प्रश्नाची साधी चौकशीही करावीशी वाटत नाही. प्रशासनही याप्रश्नी गप्प आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी रस्त्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.
जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरच या चर्चेला पूर्णविराम देत, २७ आॅक्टोबर रोजी बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रश्नी निश्चितपणे मार्ग काढणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. रस्त्याची जिल्ह्याधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने या गोष्टीचे कौतुकही अनेक घटकांनी केले. दिवसभर रस्त्याचा हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सर्वच रस्त्यांबाबत चर्चा
पेठ-सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. या सर्व महत्त्वाच्या खराब रस्त्यांबाबत सोशल मिडीयामधून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यामुळे या सर्वच रस्त्यांच्या स्थितीबाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार व रस्त्याची मालकी असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काही तरी निर्णय होणार, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.