दीपाली काळे पुन्हा चौकशीच्या फेºयात कोठडीत मारले, आंबोलीत जाळले प्रकरण; ‘सीआयडी’कडून सांगलीत स्वतंत्र तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:08 AM2017-12-19T00:08:30+5:302017-12-19T00:08:53+5:30
सांगली : शहर पोलिस ठाण्यातून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पळून गेल्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने रचलेल्या बनावाबाबत सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची
सांगली : शहर पोलिस ठाण्यातून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पळून गेल्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने रचलेल्या बनावाबाबत सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सीआयडीकडून चौकशी केली जाणार असल्याचे अप्पर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सोमवारी सांगितले. गेल्या आठवड्यात या गुन्ह्याचा स्वतंत्रपणे तपास आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सांगली शहर पोलिसांनी लूटमारप्रकरणी ६ नोव्हेंबरला अनिकेत व अमोलला अटक केली. कोठडीच्या पहिल्याचदिवशी अनिकेत व भंडारेला चौकशीसाठी ‘डीबी’ रूममध्ये आणले. कामटेच्या पथकाने या दोघांपैकी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटे, बडतर्फ हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी, अनिकेत व अमोल भंडारे हिसडा मारुन ‘डीबी’ रूममधून पळून गेल्याचा बनाव रचला. यासंदर्भात कामटेने स्वत: शहर पोलिस ठाण्यात दोघे पळून गेल्याची फिर्याद दाखल केली होती. अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळल्याचे उघडकीस आले. गेल्या आठवड्यात हा तपास सीआयडीकडेच वर्ग केला. कामटेने आरोपी पळून गेल्याची फिर्याद कोणत्याआधारे दिली? ही फिर्याद कोणी दिली? त्यावर सही कोणी केली? याचा तपासातून उलगडा केला जात आहे. घटनेदिवशी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी शहर पोलिस ठाण्यातील कोठडीला भेट देऊन आरोपी तपासले होते. त्यावेळी त्यांना अनिकेत व अमोल नसल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर ते दोघेही पळून गेल्याची माहिती कर्मचाºयांनी दिली होती. त्यामुळे सीआयडीकडून त्यांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.
चौकशीनंतर गुन्हे , अटकेची कारवाई
अनिकेत कोथळेप्रश्नी विधानसभेत १४ आमदारांनी तारांकित प्रश्न व दोन आमदारांनी लक्षवेधी मांडल्याने सीआयडीचे अधिकारी तपासाची माहिती घेऊन नागरपूरला रवाना झाले होते. त्यामुळे गेली आठ दिवस तपास थांबला होता. हे अधिकारी रविवारी सांगलीत दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड म्हणाले, अनिकेत व अमोल भंडारे पळून गेलेल्या बनावाचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान कोण दोषी आढळला तर, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाईल.