धीरज पाटील याचेही बँक खाते गोठविले, व्हिसा फसवणूक प्रकरणी कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 02:58 PM2017-12-17T14:58:19+5:302017-12-17T14:58:29+5:30
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज पाटील (रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याचे स्टेट बँकेच्या दक्षिण शिवाजीनगर शाखेतील बँक खाते पोलिसांनी शनिवारी गोठविले.
सांगली - मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज पाटील (रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याचे स्टेट बँकेच्या दक्षिण शिवाजीनगर शाखेतील बँक खाते पोलिसांनी शनिवारी गोठविले. त्याच्या बँक खात्यावरील सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती मागविली आहे.
कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आला होता. दोन दिवसापूर्वी पोलिसांनी कौस्तुभ पवारला अटक केली होती. त्याचेही कोटक महिंद्र बँकेच्या सांगली शाखेतील खाते गोठविले आहे. कौस्तुभ पवार हा धीरजकडे तरुणांना घेऊन जात होता. त्याबदल्यात धीरजकडून त्याला कमिशन मिळत होते, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
धीरजच मास्टरमार्इंड
या व्हिसा प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी धीरज पाटील हा मलेशिया येथे गेला होता. यावेळी परदेशी तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणाºया काही व्यक्तींशी त्याची ओळख झाली. तेथून भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. त्याचा हा व्यवसाय अनेक दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होता. मात्र या फसवणूक प्रकरणामुळे तो उघडकीस आला.