नाट्य स्पर्धेमुळे कलाकाराला बळ
By admin | Published: November 17, 2015 11:41 PM2015-11-17T23:41:23+5:302015-11-18T00:14:10+5:30
अरुण नाईक : सांगलीत विभागीय स्पर्धेस प्रारंभ
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना कला सादर करून उमलण्याची संधी मिळते. अशा स्पर्धा वारंवार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नाईक यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मंगळवारी प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. ते म्हणाले की, सांगलीचा नाट्यपंढरी म्हणून राज्यभर नावलौकिक असल्यामुळे अनेक हौशी नाट्य स्पर्धांमध्ये येथील कलाकार उतरतात. शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेचे व्यासपीठ म्हणजे कलाकाराला भूमिकेतून उमलण्याची चांगली संधीच आहे. या स्पर्धेतून अनेक दिग्गज नाट्य कलाकार तयार झाले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धा सुरू ठेवण्याची गरज आहे. कलारसिकांनीही या स्पर्धांना हजेरी लावल्यास कलाकारांना उर्जा मिळेल.
निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, नाट्य कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. यामध्ये आमच्याकडून काही उणिवा राहिल्यास कलाकारांनी तात्काळ संपर्क साधावा.
बसवेश्वर घोडके (नांदेड), चंद्रकांत अत्रे (जळगाव) आणि गजानन कराळे (कल्याण) नाट्य स्पर्धेचे परीक्षक आहेत. सांगली केंद्राचे समन्वयक श्रीनिवास जरंडीकर यांनी प्रास्ताविक केले. शशांक लिमये यांनी आभार मानले. यावेळी शफी नायकवडी, श्रीनिवास शिंदगी, विजय कडणे यांच्यासह नाट्य कलाकार उपस्थित होते.
राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ ‘आमदार सौभाग्यवती’ या नाटकाने झाला. सातारा येथील थिएटर वर्कशॉप नाट्य संस्थेने हे नाटक सादर केले. रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीवर हे नाटक आधारित असून, श्रीनिवास जोशी यांनी नाट्य रूपांतर केले आहे. रवींद्र डांगे दिग्दर्शक आहेत. चित्रा भिसे, गंगाधर पेटकर, गणेश धावडे, पुष्पा कदम यांच्यासह दहा कलावंतांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)