वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 11:39 PM2016-07-04T23:39:51+5:302016-07-05T00:06:03+5:30

अन्यायी दरवाढ : अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी

Entrepreneurs' Eligar against electricity hikes | वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचा एल्गार

वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचा एल्गार

Next

कुपवाड : महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. या दरवाढीने उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून ही अन्यायी दरवाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी कृष्णा व्हॅली चेंबर, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, उद्योग विकास आघाडीसह इतर उद्योजक संघटनांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. या अन्यायी दरवाढीविरोधात उद्योजकांनी एल्गार पुकारला आहे.
महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे पाठविलेल्या प्रस्तावामध्ये राज्यातील वीज ग्राहकांवर ५६,३७२ कोटींची दरवाढ लादली आहे. ही दरवाढ पहिल्यावर्षी १९ टक्के आणि चौथ्यावर्षी २७ टक्के होणार आहे. ती औद्योगिक, घरगुती, व्यापारी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारी असून औद्योगिक क्षेत्र भकास करणारी आहे. वास्तविक इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वीजदर ४० टक्क्यापर्यंत जास्त आहेत. हे दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्याची गरज आहे, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, दीपक शिंदे-म्हैसाळकर, वाळवा चेंबरचे अध्यक्ष सर्जेराव यादव, विटा यंत्रमाग संघटनेचे किरण तारळेकर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनांनी प्रथम अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी महावितरणच्या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांनी उद्योग संघटनांना उद्योजकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन दिले. उद्योजकांच्यावतीने सतीश मालू, संजय अराणके, दीपक शिंदे, शिवाजी पाटील, किरण तारळेकर, डी. के. चौगुले या उद्योजकांनी निवेदन देतेवेळी दरवाढीबाबत म्हणणे मांडले.
आंदोलनावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, उद्योजक के. एस. भंडारे, अरविंद जोशी, बन्सी ओस्तवाल, हरीभाऊ गुरव, शशिकांत मसुटगे, नंदकुमार महाजन, प्रकाश पाटील, सुधीर भगत, अजय खांबे, बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड, दीपक मर्दा, गुंडू एरंडोले, रतिलाल पटेल, संजय बेडगे, विजय भगत, सदाशिव मलगान, संतोष भावे, गणेश निकम, बी. एस. सूर्यवंशी उपस्थित होते. (वार्ताहर)


तीस हजार हरकती : उद्योजक आक्रमक होणार
कृष्णा व्हॅली चेंबर, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, उद्योग विकास आघाडी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीसह इतर संघटनांनी पुढील कालावधित आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शासनाला उद्योजकांच्या तीस हजार हरकती पाठविल्या जाणार आहेत. खासदार, आमदारांना दरवाढ कमी करण्यासाठी निवेदने दिली जाणार आहेत. त्यानंतरही शासनाने दर कमी न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असा इशारा उद्योजकांनी दिला. शासनाने वेळीच या अन्यायाची दखल घेऊन दरवाढ कमी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. चौगुले, मनोज भोसले, अशोक कोठावळे, जफर खान, रवींद्र मिरजकर, अंकुश चव्हाण आदींच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनीही जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. ‘उद्योग क्षेत्राला ग्रहण लागले, सरकारला देणे-घेणे नाही उरले’, ‘वीज दरवाढीने यंत्रमाग उद्योग होतोय भकास, ठप्प होतोय महाराष्ट्राचा विकास’, अशा घोषणांचे फलक झळकविण्यात आले.

Web Title: Entrepreneurs' Eligar against electricity hikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.