मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पाच लाख पत्र
By admin | Published: February 21, 2017 11:37 PM2017-02-21T23:37:46+5:302017-02-21T23:37:46+5:30
विनोद कुलकर्णी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचा पुढाकार
सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पाच लाख पत्रे पाठवण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतला आहे,’ अशी माहिती शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु केंद्र सरकारने अजूनही या प्रस्तावास मान्यता दिलेली नाही. केंद्र सरकारचे या दर्जासंदर्भातील चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते, याचे असंख्य पुरावे त्यात सादर करण्यात आलेले आहेत.
साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञांच्या समितीने एकमताने हा अहवाल संमत केला होता व हा दर्जा मराठीला तत्काळ द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्याला दोन वर्षे होत आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीसाठी फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न झाले आहेत.
हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातील एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोट्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी भाषा या कसोट्या निश्चितपणे पूर्ण करते.
केंद्र सरकारने आजवर भारतातील सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठत्वावर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते. दोन वर्षे होत आली तरीसुद्धा अजून केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. त्यासाठी आता पुन्हा लोक चळवळ उभी करून हा दर्जा तत्काळ देण्यासाठी केंद्र सरकारवर लोकशक्तीचा दबाव आणणे गरजेचे आहे, त्यासाठी महाराष्ट्रातून पाच लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार असून, सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाखा आणि साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ आणि सोपानराव चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेणार आहेत. (प्रतिनिधी)