सांगली : ​​फडणवीस यांच्या रडारवर जयंतराव, इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:26 PM2018-02-14T15:26:59+5:302018-02-14T15:34:37+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.

Focus on the Radar of Jayantrao, Islampur constituency | सांगली : ​​फडणवीस यांच्या रडारवर जयंतराव, इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत

सांगली : ​​फडणवीस यांच्या रडारवर जयंतराव, इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत

Next
ठळक मुद्देजयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

अशोक पाटील 

इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. नागपूरला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये पाटील यांनी थेट केंद्र सरकारलाच टार्गेट केले. याचाच वचपा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राहणार आहेत.

आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीने ३१ वर्ष निर्विवाद सत्ता अबाधित ठेवली होती. जयंत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणत निधीही मिळवला. परंतु त्यामानाने विकास झाला नाही. पालिकेतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली होती. त्यामुळेच अशा नेत्यांना पालिका निवडणुकीत जनतेने खड्यासारखे बाजूला केले आणि पालिकेत विकास आघाडीची सत्ता आली.

घराणेशाही, पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन यावरून खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दरी पडली आहे. त्यामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्याचा परिणाम राजकीय पटलावर दिसू लागला आहे.

या दोन्ही तालुक्यात काँग्रेस, शिवाजीराव नाईक गट, महाडिक, हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे. शेट्टी की खोत यांच्या पाठीमागे जायचे यामध्येच ते गुरफटलेले दिसत आहेत.

इस्लामपूर मतदारसंघ आणि शहराच्या विकासासाठी जयंत पाटील आणि खा. राजू शेट्टी आपल्या फंडातून विविध विकासकामांना सुरुवात करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ना त्या कामाच्या निमित्ताने इस्लामपूर मतदार संघाच्या दौºयावर पाचवेळा आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी मोठी आश्वासने दिली आहेत. परंतु त्याची पूर्ती मात्र झालेली नाही.

हाच धागा पकडून मुख्यमंत्री इस्लापूरला येण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ही टीका आणि नागपूर हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचा वचपा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूरच्या कार्यक्रमात काढला.

जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच आम्ही वर्षभरात १३२ कोटी आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र आलेला निधी मुरला कुठे, असाही सवाल जनता विचारू लागली आहे. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत. याचा फायदा सदाभाऊ खोत यांना कितपत होणार, हे आगामी विधानसभेलाच स्पष्ट होणार आहे.

टोलेबाजी : आता प्रतीक्षा उत्तराची

साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही मात्र केवळ ११ महिन्यात १३२ कोटी रुपये दिले, असा टोला फडणवीस यांनी जयंतरावांना लगावला. त्यावर ते काय उत्तर देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Focus on the Radar of Jayantrao, Islampur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.