सांगलीत चार गॅस सिलिंडरचा स्फोट; 24 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:02 PM2019-02-14T17:02:27+5:302019-02-14T17:03:02+5:30
महिला जखमी : रेडकाचा मृत्यू
वाळवा (जि. सांगली) : वाळवा येथील बाराबिगा वसाहतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता गंगुबाई प्रकाशे यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचे लोळ उठले. त्यामुळे वस्तीतील इतर घरांनी पेट घेतला. त्यात पांडुरंग डांगे, शंकर करांडे, काकासाहेब लोखंडे, दशरथ करांडे, शिवाजी चिखले यांच्या घरातील गॅस सिलिंडरचेही स्फोट झाले. यात एक महिला व म्हैस जखमी झाली असून एका रेडकाचा मृत्यू झाला आहे.
गॅस सिलेंडरच्या स्फोटातील घटनेची माहिती समजताच हुतात्मा कारखान्याच्या अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. वस्तीमधील 24 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. तर घरातील संसारोपयोगी साहित्य, दागिने, रोख रक्कम जळून खाक झाली. स्फोट व आगीचा लोट पाहून सुगंधा यमगर या बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनानेही पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.