शासन, साखर कारखानदारांकडून फसवणूक : रघुनाथ पाटील
By admin | Published: January 16, 2015 11:32 PM2015-01-16T23:32:02+5:302015-01-16T23:42:09+5:30
सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून
अंकलखोप : शेतकरी वर्गाला सरकार व कारखानदार फसवत असून एफआरपीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या उसाला, कवडीमोल किंमत देण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडावा व आपल्या उसाची योग्य ती किमत मिळण्यासाठी संघर्षाला तयार व्हावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.
प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्ष यांच्या एकत्रित शेतकरी संघर्ष समितीमार्फत अंकलखोप येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, सत्ताधारी यांच्याशी हातमिळवणी करत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित उसाला भाव न मागता कमी दरावर तडजोड करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न केला आहे व आपल्यामुळे उसाला दर मिळतो असा डांगोरा पिटत आहेत. स्वत: खासदार असूनही सरकारने शेतकऱ्यांच्या उसाची ३ टक्के रिकव्हरी कमी करून किमान आधारभूत किंमत ठरविली. त्यावेळी खासदार शेट्टी कोठे होते, असा सवाल त्यांनी केला. उसाला उत्पादन खर्चावर आधारित ३५०० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे. आयात साखरेसाठी सरकारने कर आकारावा, साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, सरकारने साखर उत्पादनावरचा कर कमी करावा, त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर देता येईल अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी शेतकरी नेते बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, कारखानदारी परवडत नाही म्हणून ओरडणाऱ्यांनी कारखान्याची ५ ते ६ लायसन्स का घेतली आहेत? शेतकऱ्यांनी आता अभ्यासपूर्ण शेती करावी.
यावेळी प्रकाश मिरजकर, सर्जेराव पवार, बाबूराव पाटील, पी. जी. पाटील (बुर्ली), श्रीकांत लाड, बी. जी. पाटील (बळीराजा संघटना) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसंतराव बिरनाळे, संदीप सूर्यवंशी, राजकुमार पाटील, संजय संकपाळ, ए. डी. पाटील, भास्कर चौगुले, अरुण सावंत, उदयसिंह सूर्यवंशी, संग्राम पाटील, रमेश पाटील, शहाजी गुरव, घन:शाम सूर्यवंशी, विश्वास पाटील (बांबवडे) तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रकाश मिरजकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
अंकलखोप येथे ठिकाणी सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून या समितीच्या माध्यमातून ऊस लढ्यासाठी एकत्रित येण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्याची पहिली सभा अंकलखोपला झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.