खाकी वर्दीतल्या गुन्हेगारांनाही सोडणार नाही..: सुहेल शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:10 AM2017-11-24T00:10:56+5:302017-11-24T00:14:55+5:30
सांगली : गुन्हेगार रस्त्यावरचे असोत अथवा वर्दीतले, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिला.
सांगली : गुन्हेगार रस्त्यावरचे असोत अथवा वर्दीतले, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिला.तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांची गुरुवारी तडकाफडकी बदली झाली. बदलीचा आदेश निघताच अवघ्या तीन तासात शर्मा यांनी नूतन पोलिसप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शर्मा म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरण पूर्णपणे माहीत झाले आहे. अतिशय निंदनीय घटना घडली आहे. सीआयडी याचा तपास करीत आहेत. संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सांगली पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. जनसामान्यात पोलिस दलाची असलेली प्रतिमा मलिन झाली आहे.
अत्यंत खडतर काळात शासनाने माझ्यावर विश्वास टाकून सांगलीच्या पोलिसप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. चांगले काम करुन हा विश्वास सार्थ करुन दाखविला जाईल. जनसामान्यांमध्ये असलेली पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलिस व जनता यांच्यात कुठे दुरावा निर्माण होत असेल, तर तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनसंपर्क ठेवून कामे करण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
सारेच वाईट नसतात...
शर्मा म्हणाले, पोलिस दलात सर्वच अधिकारी व कर्मचारी वाईट नसतात. पण जे वाईट व कामचुकार आहेत, त्यांची गय केली जाणार नाही. गुन्हेगार रस्त्यावरचा असो अथवा वर्दीतला, त्याला सोडणार नाही. कायदा काय असतो, हे त्यांना दाखवून दिले जाईल. चांगले काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप मारली जाईल
पोलिसिंगवर भर
शर्मा म्हणाले, सांगली जिल्ह्यात काम करताना बेसिक पोलिसिंगवर भर दिला जाईल. जनसंपर्क हा केंद्रबिंदू मानून काम केले जाईल. जिल्ह्याचा दौरा करुन माहिती घेतली जाईल. अधिकाºयांची बैठक घेतली जाईल. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातील. त्यानंतर कामाची दिशा स्पष्ट केली जाईल.