सांगलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनीहल्ला, रेकॉर्डवरील सराईत गुंड शाहरुख नदाफला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:31 PM2017-12-14T13:31:22+5:302017-12-14T13:35:24+5:30
पूर्ववैमनस्यातून अमर खाजा मोकाशी (वय १६, रा. बावडेकर कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर) याच्यावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. उर्मिलानगर येथे बुधवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर शाहरुख नदाफ (वय १९, रा. इंदिरानगर, सांगली) यास अटक केली आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
सांगली : पूर्ववैमनस्यातून अमर खाजा मोकाशी (वय १६, रा. बावडेकर कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर) याच्यावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. उर्मिलानगर येथे बुधवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर शाहरुख नदाफ (वय १९, रा. इंदिरानगर, सांगली) यास अटक केली आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
अमर मोकाशी व गुंड शाहरुख नदाफ यांच्यात पंधरा दिवसापूर्वी दारुच्या नशेत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यांच्यातील हा वाट मिटलाही होता. पण तेंव्हापासून दोघेही बोलत नव्हते. बुधवारी रात्री अमर व त्याचा मित्र असिफ गाडेकर उर्मिलानगरमधील स्वाधार मंगल कार्यालयाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी शाहरुख नदाफ व त्याचा अल्पवयीन साथीदार तिथे आले.
शाहरुखने पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादाचा अमरला जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. शाहरुखने खिशातील चाकू काढून अमरवर हल्ला चढविला. सात ते आठवेळा त्याने अमरवर चाकूचे वार केले. यामध्ये अमर रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडताच शाहरुख व त्याच्या साथीदाराने पलायन केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची पळापळ झाली.
नागरिकांनीच संजयनगर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी अमरला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या हातावर, दोन्ही पायावर, छातीवर, गुडघ्यावर, मानेवर व घोट्यावर असे सात वार झाले आहेत.
डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केल्याने त्याच्या प्रकृतीचा धोका टळला. गुरुवारी सकाळी संजयनगर पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला.
चौथा गुन्हा दाखल
शाहरुख नदाफ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनीहल्ला, मारामारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. आता त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा नोंद आहे. याला अटक करण्यात यश आले आहे. त्यास शुक्रवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे का? याचा शोध सुरु असल्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील यांनी सांगितले.